राज्यात तीन हजार वाड्यांची तहान टँकरवर

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पावसाने ताण दिला, धरणे-तलाव भरलेच नाहीत. खरिपाचा हंगाम हातचा गेला, रब्बीसाठी परतीच्या पावसानेही हात दिला नाही. परिणामी, दिवाळी संपत असतानाच दुष्काळाच्या गडद छायेत महाराष्ट्र होरपळू लागलाय, दिवसागणिक त्याची तीव्रता वाढत आहे. त्याची व्यथा मांडणारी वृत्तमालिका आजपासून...

औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे उपस्थित करीत आहेत. दरम्यान, टॅंकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत तर नाही ना, असा संशय यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

काही वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या ग्रामस्थांना दर वर्षी सरकारी घोषणांचा सुकाळ ऐकूनच क्षणिक आनंद मानावा लागतो. योजना पूर्णपणे राबविल्याचे कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनाला अद्यापही टॅंकरपासून नागरिकांची सुटका करता आलेली नाही. साडेचार हजार गावांना टॅंकरने पाणीपुरवठ्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गावागावांत पाणीपुरवठ्यासह अन्य योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. असे असतानाही टॅंकरने पुरवठा  होत असलेल्या गावांची संख्या घटण्याऐवजी वाढतच असल्याचे सरकारकडील आकडेवारीने स्पष्ट होते. 

सर्वाधिक टंचाई मराठवाड्यात
मराठवाड्यातील ९८९ गाव-वाड्यांवरील १६ लाख १४० ग्रामस्थांची तहान सध्या ९७० टॅंकरच्या माध्यमातून भागवली जाते. विशेष म्हणजे, अन्य विभागांच्या तुलनेत सद्य:स्थितीत सर्वाधिक टॅंकर मराठवाड्यात सुरू आहेत. त्यातदेखील ५७२ टॅंकर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. राज्यातील जिल्हानिहाय टॅंकर असे - पालघर ५, नाशिक ११०, धुळे ९, जळगाव २९, नगर ३५१, पुणे ४६, सातारा ५३, सांगली ४४, सोलापूर ९, जालना १४१, उस्मानाबाद १०, बुलडाणा ३०, अमरावती १, नांदेड २ आणि बीड २४५. असे एकूण १ हजार ६५७ टॅंकर सुरू आहेत.

सांगलीत दुष्काळी उपाययोजना
सांगली जिल्ह्यातील सहा तालुके आणि टंचाईग्रस्त ४६७ गावांत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. पूर्व भागातील लोक टंचाईने हैराण आहेत. शेतकरी चाऱ्याअभावी पशुधन कवडीमोलाने विकत आहेत. जिल्ह्यातील ५ मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या जानेवारीत हाच साठा ५६ टक्के होता. लोकांना मागणीप्रमाणे टॅंकर आणि रोजगार हमीची कामे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढताहेत. मे-जून २०१९ मध्ये सर्वाधिक १९९ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

बारामतीत दुष्काळ
बारामती तालुक्‍यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १२ गावे आणि १४० वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी १६ टॅंकरच्या ६० खेपा दररोज सुरू आहेत. जळगाव सुपे येथे हमी योजनेच्या कामावर दोनशेवर मजूर काम करीत आहेत. हमी कामांची आणि पाणीटॅंकरची मागणी वाढत आहे. बारामती तालुक्‍यात यंदा केवळ २२३ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे.

टॅंकरद्वारे पिण्यासाठीच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, ते कुठल्याही जलशुद्धीकरण केंद्रातून भरले जात नाहीत. यासाठी सरकारची कुठलीही देखरेख यंत्रणा नसल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची भीती आहे. टॅंकरचे पाणी शुद्धीकरण केंद्रातून भरावे, अशी मागणी तीन महिन्यांपूर्वीच विभागीय आयुक्‍तांकडे केली. मात्र, त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. 
- संतोष जाधव, शेतकरी नेते. 

यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने भर पावसाळ्यातही तीन टॅंकरने गावांना पाणी पुरवले जात होते. आता उन्हाळा सुरू होत असतानाच टॅंकरची संख्या दुप्पट करावी लागली. यात जनावरांसाठी स्वतंत्र एका टॅंकरची मागणी करावी लागली. 
- लक्ष्मण जानराव, पोलिस पाटील, कनकोरी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद.

(क्रमशः)

Web Title: Three thousand wadi water shortage in state