दुचाकी दगडावर आदळून वरूड येथे तीन युवक ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

जाफराबाद तालुक्‍यातील वरूड बुद्रुक येथील रस्त्यावरील वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले. हा अपघात मंगळवारी (ता. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला.

वरूड बुद्रुक - जाफराबाद तालुक्‍यातील वरूड बुद्रुक येथील रस्त्यावरील वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले. हा अपघात मंगळवारी (ता. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला.

कोळेगाव (ता. जाफराबाद) येथील सचिन भगवान शेळके (वय १९), अमोल माधव बकाल (२२); तसेच समाधान रामेश्वर चोंडकर (१९) हे तिघे मंगळवारी दुचाकीवर एकाचे आधारकार्ड अद्ययावत करून जाफराबादहून गावाकडे येत होते. वरूड बुद्रुक येथील संत गजानन महाराज मंदिरासमोरील पीरबाबाजवळ रस्त्यावरील वळणावर भरधाव वेगामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे डाव्या बाजूच्या वळणावरील एका मोठ्या दगडावर त्यांची दुचाकी आदळली. या अपघातात सचिन शेळके तसेच अमोल बकाल जागीच ठार झाले, तर समाधान चोंडकर याचा औरंगाबादला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तिघांना उत्तरीय तपासणीसाठी वरूडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. दरम्यान, तिघांवर रात्री कोळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Three Youth Death in Accident