गुड न्यूज! अजिंठ्याच्या जंगलात येऊन गेला वाघ... 

संकेत कुलकर्णी
Wednesday, 1 January 2020

या वाघाने आतापर्यंत साधारणतः 1500 किलोमिटर अंतर पार केले आहे. त्याला सुरक्षित अधिवास प्राप्त व्हावा, तसेच त्याच्या मार्गभ्रमणामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा येऊ नये, म्हणून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. 

औरंगाबाद : आपल्या भागात वाघ आला म्हणताच, माणसाची बोबडी वळणे साहजिक आहे. पण आपल्या जंगलात वाघ असणे ही नैसर्गिकदृष्ट्या अतिशय समृद्धीची बाब आहे. पूर्वापार वाघाचा इतिहास असलेल्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगेत फर्दापूर-सोयगाव वनक्षेत्रात सुमारे पाच दशकांनंतर वाघाचे आगमन झाले होते. आता हा वाघ परत गेला असला, तरी या भागात वाघाचा अधिवास प्रस्थापित होऊ शकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्‍वर अभयारण्यातील टी1-सी1 या वाघाने आतापर्यंत तब्बल 1500 किलोमिटर अंतर पार केले आहे. गेल्या महिन्यात काही दिवस त्याचे वास्तव्य औरंगाबाद, जालना जिल्ह्याच्या सीमेवर अजिंठा, फर्दापूर, सोयगाव परिसरातील वनक्षेत्रात होते, असे वन विभागाने सांगितले. 

No photo description available.
वाघाने केलेल्या प्रवासाचा मार्ग

क्लिक करा - हिंगोलीत फोडला तरुणाचा खांदा

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा वाघ फर्दापूर भागामध्ये वावरत होता. औरंगाबाद वनविभागाच्या हद्दीतील सोयगाव आणि अजिंठा परिक्षेत्राच्या जंगलामध्ये या वाघाने डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत भ्रमंती केली. नंतर अजिंठा लेण्यांचा भाग असलेला जंगलातून तो परतीच्या प्रवासाला लागला, असे पेंच व्याघ्रप्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

कुठून, कसा आला वाघ? 

हा वाघ ऑक्‍टोबरमध्ये तेलंगणातील आदिलाबाद, पांढरकवडा भागात संचार करत होता. त्यानंतर ऑक्‍टोबर अखेरीस तो किनवट-नांदेडच्या सीमेवर आला आणि नोव्हेंबरच्या सुरवातीला त्याने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. या ठिकाणी चार गायींची शिकार त्याने केल्यामुळे गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये दहशत पसरली होती.

हुश्श - पहाटेच्या दूरध्वनीने प्रशासनाने सोडला निश्वास 

...म्हणून पाळली गुप्तता 

या वाघाला 27 फेब्रुवारीला रेडीओ कॉलर लावली होती. कमी कालावधीत जास्त अंतर पार करण्याची क्षमता असलेल्या सी1च्या हालचालीवर वन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहाय्याने स्थानिक वन अधिकारी या वाघाच्या हालचाली टिपत आहेत. या वाघाने आतापर्यंत साधारणतः 1500 किलोमिटर अंतर पार केले आहे. त्याला सुरक्षित अधिवास प्राप्त व्हावा, तसेच त्याच्या मार्गभ्रमणामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा येऊ नये, म्हणून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. 

वाघ शांतच; तुम्ही अशांत होऊ नका 

आतापर्यंतच्या प्रवासात या वाघाकडून स्वतःहून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. हिंगोलीत त्या परिसरात सलग वनक्षेत्र नसल्याने तो उघड्यावर आला आणि भुकेल्या वाघाने चार गायींचा फडशा पाडला. यावेळी गोंधळ होऊन त्याबद्दल भीती निर्माण झाली. मात्र, तेथून तो सुरक्षित टिपेश्‍वरला परत गेला होता. अजिंठा परिसरात मात्र, त्याने मानवी वस्तीला कुठलाही धोका पोहोचवला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, कुठल्याही प्रकारचे उपद्‌व्याप करू नयेत, असे आवाहनही वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

व्वा रे शेर - पाच महिन्यांत १३०० किमी प्रवास

आपल्या परिसरात वाघ आला होता, हे खरे आहे. आता तो परत गेला असला, तरी आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. खरेतर वाघाची सुरक्षा हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय असल्यामुळे अधिक माहिती देणे योग्य नाही. मात्र, गावकऱ्यांनी विनाकारण भीती बाळगण्याचे कारण नाही. 

- प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक, वन विभाग, औरंगाबाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger in Ajanta Forest Range Aurangabad Jalna Breaking News