गुरूजींच्या शाळा होताहेत बंद!

संदीप लांडगे  
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यातील तब्बल नऊ महाविद्यालये पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी ओस पडली आहेत. तसेच विनाअनुदान तत्त्वावर ही महाविद्यालये चालविणे अशक्‍य असल्याने ती आता कायमची बंद करण्याचा निर्णय संस्थाचलकांनी घेतला आहे. 

औरंगाबाद-मागील दहा वर्षांपासून राज्यात शिक्षक भरतीला लागलेले ग्रहण आजही कायम आहे. सध्याच्या शैक्षणिक वातावरणात डीएडकडे विद्यार्थ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे वातावरण आहे. महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली मारामार लक्षात घेऊन जिल्ह्यातील तब्बल नऊ महाविद्यालये पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी ओस पडली आहेत. तसेच विनाअनुदान तत्त्वावर ही महाविद्यालये चालविणे अशक्‍य असल्याने ती आता कायमची बंद करण्याचा निर्णय संस्थाचलकांनी घेतला आहे. 

आठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात डीएडची 90 पेक्षा जास्त अध्यापक महाविद्यालये होती. मात्र, शासनातर्फे शिक्षक भरतीच होत नसल्याने मुलांचा या क्षेत्राकडे जाण्याचा कल हळूहळू कमी झाला. परिणामी, दरवर्षी विद्यार्थी संख्येअभावी चार-पाच महाविद्यालये बंद पडत गेली. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील 50 महाविद्यालये विद्यार्थी संख्येअभावी बंद पडली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 41 डीएडचे महाविद्यालये सुरू होती. विद्यार्थीच मिळत नसल्याने 2019-20 या सत्रात जिल्ह्यातील नऊ महाविद्यालये पुन्हा बंद पडली. 32 विद्यालये अद्याप सरू आहेत. परंतु या 32 अध्यापक महाविद्यालयांत अगदी नगण्य विद्यार्थी संख्या आहे. जवळपास सर्वच अध्यापक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची पटसंख्या दहाच्या खालीच असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या विद्यार्थ्यांनी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याने महाविद्यालयांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. शिक्षक भरती होतच नसल्याने या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. 
बारावी पास झाल्यानंतर पुढे काय करणार या प्रश्‍नाच्या उत्तराला पूर्वी दहापैकी आठ विद्यार्थी डी.एड करून शिक्षक होणार असल्याचे अभिमानाने सांगत होते. पालकांनाही मुलगा, मुलगी डीएडला असल्याचे कौतुक वाटायचे. मात्र, आता शिक्षक भरती नाही, खासगी संस्थेतही नोकऱ्यांची मारामार यामुळे गुरूजींची शाळा केली जात असल्याने अनेक तरुणांनी या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक अध्यापक महाविद्यालयांना दरवर्षी टाळे ठोकले जात आहे. 

जिल्ह्यातील बंद झालेली डीएड महाविद्यालये 
प्रेमचंद मुगदिया अध्यापक विद्यालय (औरंगाबाद), संत गाडगे महाराज अध्यापक विद्यालय (औरंगाबाद), गांधारीबाई अध्यापक विद्यालय (औरंगाबाद), जनता अध्यापक विद्यालय, (बीड बायपास), न्यू डीटीएड कॉलेज धामणगाव (ता. फुलंब्री), सरदार पटेल अध्यापक विद्यालय (फुलंब्री), नोबेल अध्यापक विद्यालय (औरंगाबाद), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालय, (पिंपळगाव वळण औरंगाबाद), सावित्रीबाई फुले अध्यापक विद्यालय (औरंगाबाद) 

शिक्षक भरती होत नसल्याने मुलांनी बारावीनंतर दुसरे पर्याय शोधणे सुरू केले आहे. महाविद्यालयांना विद्यार्थीच मिळत नाहीत. जी महाविद्यालये सुरू आहेत; त्याठिकाणीही अत्यल्प विद्यार्थीसंख्या आहे. त्यामुळे संस्थाचालक शिक्षण शिक्षक परिषद, पुणे येथे जाऊन महाविद्यालय बंद करण्याची परवानगी घेत आहेत. 
मारुती गायकवाड, डीएड, जिल्हा विभागप्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time to close faculty colleges