आज बहुजन क्रांती मूक मोर्चाबाबत आयुक्तालयात बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - शहरात बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दल कामाला लागले असून सुमारे दीड हजार पोलिसांचा ताफा व एसआरपीएफच्या दोन कंपन्या बंदोबस्तासाठी राहणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वीस खासगी कॅमेरामनही व्हिडिओ शूटिंग करणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली. 

औरंगाबाद - शहरात बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दल कामाला लागले असून सुमारे दीड हजार पोलिसांचा ताफा व एसआरपीएफच्या दोन कंपन्या बंदोबस्तासाठी राहणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वीस खासगी कॅमेरामनही व्हिडिओ शूटिंग करणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली. 

बहुजन मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी उपाययोजना व व्यूहरचनात्मक डावपेच ठरविण्यात आले होते. त्यानुसार, पोलिस दल कामाला लागले आहे. गुरुवारी (ता. तीन) पोलिस आयुक्तालयात बैठक घेत मोर्चेकऱ्यांना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सूचना दिल्या आहेत. शहरात येणारे अफाट लोक व वाहनांची संख्या पाहता, नागरिकांना रहदारीच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. वाहने पार्किंग करण्यासाठी जागा ठरविण्यात आल्या आहेत. गर्दी व कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या. दीड हजार पोलिस मोर्चा मार्गावर; तसेच विविध मोक्‍याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. दोन एसआरपीएफ कंपन्यांनाही तैनात करण्यात आल्या आहेत; तसेच अग्निशामक दलाचे बंब, रुग्णवाहिकाही या मोर्चासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. 
 

हे मार्ग टाळा 
सकाळी दहाच्या सुमारास क्रांती चौक व पैठणगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंतचे मार्ग टाळावेत. 
दुपारी एकच्या सुमारास महावीर चौक, मिलकॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे मार्ग टाळावेत. 
औरंगपुऱ्यात वाहनधारकांनी वाहने नेऊ नयेत, 
मिलकॉर्नर-औरंगपुरा-गणेश कॉलनी-टीव्ही सेंटर येथून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तालयाकडे जाणे टाळावे. 
जालना रस्त्यावरही मोठी गर्दी असू शकते, म्हणून पर्यायी मार्गांचा जास्त वापर करावा. 
 

असा आहे मोर्चाचा मार्ग 
बहुजन क्रांती मूक मोर्चा क्रांती चौकातून निघेल. हा मोर्चा नूतन कॉलनी-सिल्लेखाना-रॉक्‍सी सिनेमागृह कॉर्नर-पैठणगेट-बाराभाई ताजीया-औरंगपुरा महात्मा फुले चौक-मिलकॉर्नर-भडकलगेटमार्गे आमखास मैदान येथे मोर्चा विसर्जित होईल. या मार्गावर सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मोठी गर्दी राहील. 
 

पोलिसांचे आवाहन 
आमखास मैदान ते मिलकॉर्नर या रस्त्यावर दुपारी एक ते सायंकाळी पाचदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी राहील. विशेषत: बंदोबस्तासाठी प्रभारी अधिकारी नेमले असून ते आवश्‍यकतेनुसार वाहतूक मार्गात बदल करू शकतात. नागरिकांनी मुख्य मार्गांचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा. 
 

पोलिसांनी घेतली मोर्चेकऱ्यांची बैठक 
बहुजन क्रांती मूक मोर्चाची तयारी व आढावा बैठक पोलिस आयुक्तालयात गुरुवारी ता. तीन घेण्यात आली. यात मोर्चासंबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. मोर्चेकऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था, व्यासपीठ, भाषण कोण करणार, पूर्वतयारी झाली का, यासंबंधित विविध बाबींवर माहिती पोलिस विभागाने पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावर पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. कर्णपुरा येथील मैदानावर पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली असून बाहेरगावावरून आलेली व्यक्ती तेथे वाहने लावणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असून शांततेत मोर्चा पार पडावा, यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोर्चात प्रथमत: भंतेजी, त्यानंतर महिला-मुली, त्यानंतर नागरिक व पदाधिकारी-कार्यकर्ते राहतील. 
 

शंभर वॉकीटॉकीद्वारे मिळणार सूचना 
मोर्चात बहुसंख्य लोक येणार असल्याने मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांना शंभर वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. अडचण आल्यास वॉकीटॉकीद्वारे सूचना देण्यात येणार असून, पोलिसांचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती गौतम खरात यांनी दिली. 

Web Title: today Bahujan march Commission meeting