जिल्ह्यात आज उष्णतेची लाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

बीड - मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १८) तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्‍यता भारत मौसम विज्ञान विभाग, मुंबई यांनी दिली असून उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्‍यता आहे. गंभीर परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उन्हाळ्यात तहान लागलेली नसेल तेव्हाही जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्‍यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकून घ्यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना गोठ्यात ठेवावे, त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा, थंड पाण्याने वेळोवेळी अंघोळ करावी. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. बाहेर कामकाज करीत असताना मध्यंतर घेऊन नियमित आराम करावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

या गोष्टी टाळाव्यात
उन्हाळ्यात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीमध्ये स्वयंपाक करणे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

Web Title: Today heat wave