आंधळं दळतंय अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद - शहरात येणाऱ्या टोलनाक्‍यांवर वसुली, वाहनांची संख्या, टोलचा कालावधी सांगणारे इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या कारभाऱ्यांच्या काळात या टोलनाक्‍यांची किती कमाई झाली, याची माहितीच नसून, आंधळं दळतंय अन्‌ ‘कोण’ पीठ खातंय हा सवाल उभा राहिला आहे. 

‘सकाळ’च्या निरीक्षणात हे बोर्ड बंद असल्याचे समोर आले. औरंगाबाद शहरात येणाऱ्या सावंगी (हर्सूल), लासूर स्टेशन, पैठण रोड, करमाड टोल नाक्‍यांवर किती वसुली झाली याची माहिती जनतेला न देण्याचा चंग एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे. टोलचे ठिकाण, कोणत्या रस्त्यासाठी वसुली सुरू आहे, किती वसुली झाली, किती काळ टोलनाका चालणार असल्याची माहिती देण्यासाठी हे बोर्ड बसवण्यात आले; पण औरंगाबाद शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या नाक्‍यांवर याबाबत कोणतीही माहिती प्रसारित केली जात नाही. त्यामुळे ठेकेदाराने रस्त्यावर किती खर्च केला, त्यापोटी वसुली किती याची माहितीच लोकांना दिली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बोर्ड बंद असल्याबाबात विचारणा केली असता आपल्या हद्दीतील दोन नाक्‍यांचे डिस्प्ले सुरू असल्याचा दावा एमएसआरडीसीचे अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी केला.

सावंगीच्या नाक्‍यावर २०१५ ची माहिती 
सावंगी (हर्सूल) टोल नाक्‍यावरील दोनपैकी एकच डिस्प्ले बोर्ड सुरू आहे. त्यावर असलेली माहितीही ३१ जानेवारी २०१५ पासून ‘अपडेट’ नाही. या ठिकाणाहून नेमका किती टोल वसूल झाला, संबंधित टोलनाक्‍याची वसुली कधी संपणार हे कळायला मार्गच नाही. पैठण रस्त्यावरील नाक्‍याचा एक बोर्ड केवळ चमकतो. त्यावर कोणतीही माहिती वाचता येत नाही. याच नाक्‍यावरील दुसरा बोर्डही बंदच आहे.   

महासंचालकांना याबाबत कारवाई करण्यास सांगतो. नियम मोडणाऱ्यांवर निश्‍चित कारवाई केली जाईल. औरंगाबादेतील बोर्ड सुरू करण्याचे आदेशही देण्यात येतील. 
- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र.

Web Title: toll naka recovery issue