विक्रीसाठी नेलेले टोमॅटो रस्त्यावरच फेकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

कवडीमोल भाव ः लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याचे पाऊल 

शिरूर अनंतपाळ(जि. लातूर) : भल्या पहाटेपासून दहा, वीस मजूर लावून टोमॅटोची तोड केली, टेंपोही भरला अन्‌ अर्ध्या रस्त्यात येऊन बाजारपेठेत फोन लावला तर तीन, चार रुपये किलोचा भाव असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या शेतकऱ्याने रस्त्यातच टेंपो थांबवून त्यातील टोमॅटो रस्त्यावर टाकून देत घराचा रस्ता धरला. 

पाण्याचा काटकसरीने वापर करीत टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोचे पीकही चांगले आले. पण पिकले ते विकलेच नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. कमी भावामुळे टोमॅटोतून लागवड खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मोठा लागवड खर्च केला असताना टोमॅटोतून उत्पन्न तर दूरच, केलेला खर्चदेखील निघत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. 
तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पारंपरिक पद्धतीने खरीप व रब्बी हंगामातील पिके घेण्याकडे कल असतो. पण या पारंपरिक शेतीला फाटा देऊन चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने टोमॅटोसह भाजीपालावर्गीय पिकांची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली; पण यातून उत्पन्न मिळायचे दूरच राहिले. सध्या त्यातून लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. तालुका हा प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मांजरा नदीचा 15 किलोमीटरचा किनारा लाभलेला असून तालुक्‍यात घरणी, साकोळ मध्यम प्रकल्प व पांढरवाडी, उमरदरा लघुप्रकल्पासह मांजरा नदीवर गिरकचाळ व डोंगरगाव बॅरेजसह छोटे-मोठे पाझर तलाव आहेत. पण यावर्षी पाऊस झाला नसल्याने ते कोरडेठाक पडले आहेत. 

त्यातही जेमतेम पाण्यावर तालुक्‍यातील शेतकरी भाजीपाला पीक घेत आहेत. टोमॅटो, दोडका, वांगी, भेंडी, कांदे, शेवगा, कोथिंबीर, ढोबळी मिरची, मिरची, गवार, वरणा, मेथी अशा भाजीपालावर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. या भाजीपाला उत्पादनातून अधिकचे उत्पन्न मिळेल व आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य लाभेल, असे वाटत असताना भाजीपाल्याला बाजारात भावच नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

टोमॅटो लागवडीसाठी एकरी कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये लागतात. हा खर्च निघत नसल्याचे पाहून एक शेतकरी सावरगाव पाटी (ता. शिरूर अनंतपाळ) येथे रस्त्यावरच टोमॅटो टाकून देत माघारी फिरला. 

टोमॅटोचे अर्थकारण 
एक एकर टोमॅटोमधून साधारणतः 800 कॅरेट टोमॅटो निघतात. एका कॅरेटमध्ये 20 किलो टोमॅटो असतात. एका कॅरेटला सरासरी 200 रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे; पण आजघडीला फक्त 40 ते 50 रुपये कॅरेट भाव मिळत आहे. यात 50 ते 60 हजार रुपये लागवड खर्च असताना त्यातून नाममात्र उत्पन्न मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tomatoes thrown on the road