खरेदी केंद्रावर येताच होणार तुरीचा काटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

22 एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेल्या तुरीची खरेदी करण्याचे आदेश असल्याने भाववाढीच्या आशेने तूर घरी ठेवलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली. ही तूर शेतकऱ्यांना कमी भावाने बाजारात विक्री केल्याशिवाय पर्याय नव्हता. यातूनच शेतकऱ्यांकडून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी होऊ लागली

लातूर - राज्य सरकारने गुरुवारी (ता. 11) हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या आधारभूत केंद्राची मुदत 31 मेपर्यंत वाढवली. या कालावधीपर्यंत सर्व केंद्रांवर तूर खरेदी करण्याचे आदेश सरकारने दिले असून पावसाच्या शक्‍यतेमुळे केंद्रावर तूर येताच तिचे माप (काटा) करण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तुरीची विक्री करावयाची राहून गेलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने बाजारात तुरीचे भाव घसरले. यातून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने आधारभूत किंमत योजनेतून डिसेंबरमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू केले. जिल्ह्यात महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या आठ व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या लातूर येथील एका केंद्रावर तुरीची खरेदी करण्यात आली. या केंद्रावर पाच हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल दराने तुरीची खरेदी सुरू होताच बारदाना व अन्य कारणांमुळे विघ्न आले. यातूनच मध्यंत्तरी तूर खरेदी काहीकाळ बंद होऊन पुन्हा सुरू झाली व शेवटी 22 एप्रिल रोजी खरेदी बंद करण्यात आली. यात केंद्रावर मोठ्या प्रमाणात तूर पडून राहिली. त्यानंतर सरकारने बाजार हस्तक्षेप योजना राबवून केंद्रावर आलेल्या तुरीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पंचनाम्यानंतर पाच मेपासून ही खरेदी सुरू आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांवर 16 हजार क्विंटल तूर असून त्यापैकी चौदा हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी दिली. 22 एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेल्या तुरीची खरेदी करण्याचे आदेश असल्याने भाववाढीच्या आशेने तूर घरी ठेवलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली. ही तूर शेतकऱ्यांना कमी भावाने बाजारात विक्री केल्याशिवाय पर्याय नव्हता. यातूनच शेतकऱ्यांकडून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी होऊ लागली. त्यावर विचार करून सरकारने 31 मेपर्यंत तुरीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी बैलगाडी किंवा वाहनाने तूर घेऊन आल्यावर लागलीच माप करण्यात येणार असल्याचे श्री. सुमठाणे यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे आज बैठक
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत शुक्रवारी (ता. 12) तूर खरेदीशी निगडित यंत्रणांची बैठक घेणार आहेत. बैठकीत तूर खरेदीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे श्री. सुमठाणे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख 31 हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून यात महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनकडून दोन लाख 65 हजार, विदर्भ मार्केटींग फेडरेशनकडून एक लाख 16 हजार तर आत्माकडील शेतकरी कंपन्यांकडून पन्नास हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आल्याचे श्री. सुमठाणे यांनी सांगितले.

Web Title: Toor Farmers relieved