बाप रे! घाटीत डेंगीच्या रुग्णांचे अर्धशतक

योगेश पायघन
रविवार, 8 डिसेंबर 2019

डेंगीचे डिसेंबरच्या पहिल्या आठवडाभरात पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. नियोजनशून्यतेमुळे महापालिकेची रुग्णालये ओस तर घाटीत फ्लोअरबेडवर उपचार घेण्याची वेळ डेंगीच्या रुग्णांवर आली आहे. 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी (ता. आठ) डेंगीचे 19 एनएस-वन बाधित, तर 31 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. डेंगीची बाधा झालेल्यांमध्ये एका बाळंतिणीचाही समावेश आहे. बाधितांपैकी निम्मे रुग्ण शहरातील असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे डेंगीचे डिसेंबरच्या पहिल्या आठवडाभरात पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. नियोजनशून्यतेमुळे महापालिकेची रुग्णालये ओस तर घाटीत फ्लोअरबेडवर उपचार घेण्याची वेळ डेंगीच्या रुग्णांवर आली आहे. 

ऑगस्ट महिन्यापासून महापालिका क्षेत्रात डेंगीने कहर केला आहे. शहर हद्दीत बारा डेंगीसदृश रुग्णांचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) डेंगीने मृत्यू झाला. वॉर्ड 27 मध्ये उपचार घेत असलेली एक प्रसूत माता डेंगी पॉझिटिव्ह आहे. मेडिसीन विभागात वॉर्ड एकमध्ये 31 डेंगीसदृश तर नऊ रुग्ण एनएस-1 पॉझिटिव्ह आहेत. बालरोग विभागात नऊ पॉझिटिव्ह बालके उपचार घेत आहेत. वातावरणातील बदलांमुळे एकीकडे व्हायरलची साथ असल्याने वॉर्डात दुप्पट - तिप्पट रुग्णांना भरती करावे लागत आहे. क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्याने रुग्णांवर फ्लोअरबेड उपचार करावे लागत आहेत. घाटीत भरती झाल्यावरच्या पहिल्या सुईपासून सलाईनपर्यंत सर्वच औषधोपचाराचा खर्च घाटीला पेलावा लागत आहे. 

Ghati

हे उपाय करण्याचा सल्ला.... 

 • लक्षणे दिसल्यावर डॉक्‍टरांकडून उपचार घ्या 
 • डास उत्पत्ती रोखून चावू नये यासाठी उपाय 
 • आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे 
 • प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय करा 

महापालिकेची मदत नाही 

डेंगीवर उपाययोजना म्हणून महापालिकेने ऍबेटिंग, औषध, धूरफवारणी, तपासणी, जनजागृती असे उपक्रम राबवले; पण पाच महिन्यांपासून डेंगीचा प्रकोप थोपवण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आल्याचे दिसते. 32 आरोग्य केंद्रांपैकी पाच रुग्णालयांत आंतररुग्ण सेवा सुरू असताना रुग्णालयांत डेंगीचे रुग्ण नगण्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालये ओस तर घाटीचे वॉर्ड फुल्ल असल्याचे चित्र आहे; मात्र महापालिकेकडून आवश्‍यक किटसाठी दिलेल्या तीन लाखांव्यतिरिक्त शहरातील डेंगी रुग्णांच्या औषधोपचारासाठी कोणतीही मदत झालेली नाही किंवा विचारणाही करण्यात आलेली नाही. 

इथे होता - सेक्ससाठी तीन हजारांचा रेट

भासवले डेंगी आटोक्‍यात आल्याचे... 

महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या धामधुमीत शुक्रवारी (ता. सहा) केवळ 22 संशयित रुग्ण असून एकही पॉझिटिव्ह रुग्ण नोंद झाला नसल्याचे महापालिकेकडून सांगून डेंगी आटोक्‍यात आल्याचे भासवण्यात आले; मात्र प्रत्यक्षात रुग्णसंख्या घटली असली तरी सध्या तरी परिस्थिती आटोक्‍यात आली नसल्याचे चित्र आहे. एकट्या घाटी रुग्णालयात पन्नास रुग्णांची नोंद आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील आकडेवारी यापेक्षा अधिक आहे. 

अशी आहे परिस्थिती 

 • शहरात मृतांचा आकडा बारावर 
 • दोन बाळंतिणींचा मृत्यू 
 • महापालिकेचा डेंगीवर नियंत्रणाचा दावा फोल 
 • घाटीत औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांवर आर्थिक भार 
 • महापालिका रुग्णालयांत डेंगीचे रुग्ण तुरळक 
 • जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील संख्या अधिक 
 • डेंगी प्रतिबंधासाठी नियोजनात्मक उपायांची गरज
Ghati
औरंगाबाद : रविवारी रुग्णांची तपासणी करताना डॉ. गजानन सुरवाडे व सोबत निवासी डॉक्‍टरांचे पथक.

डेंगी समजून घ्या : डॉ. गजानन सुरवाडे 

याविषयी मेडिसीन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन सुरवाडे यांना वॉर्डात रुग्णांची तपासणी करताना डेंगीबद्दल विचारले असता ते म्हणाले, "तुलनेत डेंगीच्या रुग्णांची संख्या सध्या घटली आहे. मुळात क्‍लासिकल, हिमर्जिकल, शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारांत डेंगी आढळतो. डेंगीचा डास साचलेल्या शुद्ध पाण्यात जन्मतो. त्यावर नियंत्रण गरजेचे आहे. पहिल्या दिवसापासून दहा दिवस डेंगीच्या रुग्णासाठी महत्त्वाचे असतात. गर्भवती माता, लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने डेंगीचा धोका अधिक असतो. क्रॉनिक डिसीज अगोदरपासून असल्यास डेंगीची लागण झाल्यावर धोका अधिक वाढतो. सुरवातीपासून तीन ते सव्वासहा दिवसांत खोगीर म्हणजे चढउतार होणारा ताप कमी होऊन प्लेटलेट कमी होतात. त्यावर नियोजन करावे लागते. दीड ते साडेचार लाख प्लेटलेटची संख्या शरीरात असते. ती संख्या वीस हजारांपेक्षा कमी झाल्यावर शरीरात तर दहा हजारांपेक्षा कमी झाल्यास मेंदूत रक्तस्राव होतो. त्यावर नियंत्रणासाठी रॅंडम डोनर व सिंगल डोनर प्लेटलेट दिल्या जातात. आयजीजी व आयजीएम वाढायला लागल्यावर नऊ ते दहा दिवसांत डेंगीवर नियंत्रण येते.'' 

घाटीच्या कम्युनिटी मेडिसीन तज्ज्ञांच्या मते, महापालिकेने प्रतिबंधनात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करायला नको. वार्धक्‍यशास्त्र तज्ज्ञांनी डास चावणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला असून गर्भवतींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total 50 Dengue Patients Admitted in Ghati Hospital Aurangabad