घटले ४४ हजार पर्यटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

प्राण्यांची घटती संख्या चिंताजनक 
१७ एकर परिसरात जानेवारी १९८५ पासून प्राणिसंग्रहालय सुरू करण्यात आले. सुरवातीच्या काळात ससे, नीलगाय, हरीण असे लहान प्राणीच होते. पुढे बिबटे, कोल्हे, लांडगे, तरस, पिवळे वाघ, अस्वल, सिंह हे प्राणी विविध ठिकाणांहून आणण्यात आले. १९९५ मध्ये भुवनेश्वर येथून पांढरे वाघ आणण्यात आले, तर वर्षभरानंतर म्हैसूर येथून शंकर आणि लक्ष्मी हे हत्तीचे जोडपे आले. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण वाढले होते.

औरंगाबाद - मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४४ हजार पर्यटक घटले आहेत. त्यामुळे सुमारे २२ लाख ५७ रुपयांनी उत्पन्न कमी झाले आहे. महापालिकेने गतवर्षी तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली होती. त्यामुळे उत्पन्नात घट झाल्याचे बोलले जात आहे. 

मराठवाड्यातील विविध शाळा, महाविद्यालयांच्या सहली, तसेच लाखो पर्यटक सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. त्यामुळे महापालिकेला मोठे उत्पन्नही मिळत होते; मात्र गेल्या काही वर्षांत प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण कमी होत आहे. त्यामागे कारणेही आहेत. जागेच्या अडचणीमुळे सिंह, हत्ती यांसारखे प्राणी इतरत्र पाठविण्यात आले. त्यामुळे आलेले पर्यटक, बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. २०१७-१८ मध्ये प्राणिसंग्रहालयास पाच लाख १८ हजार ३३३ पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा मात्र चार लाख ७४ हजार १७६ पर्यटकच आले.

२०१७-१८ मध्ये महापालिकेला तब्बल दोन कोटी पाच लाख ३० हजार ६१० रुपयांची कमाई झाली होती. यंदा एक कोटी ८२ लाख ७३ हजार २६० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी सिद्धार्थ-समृद्धीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर महिन्याभरापूर्वी समृद्धीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यात दोन पांढरे बछडे आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism Less in Aurangabad