पर्यटकांना टवाळखोरांची पाठलाग करून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी म्हणून परिचित असलेल्या औरंगाबादेत पर्यटकांचीच सुरक्षा धोक्‍यात येत आहे. सुमारे वीस मिनिटे कारने सलग पाठलाग करून टवाळखोरांनी महिलांना छेडत पर्यटक कुटुंबाला मारहाण केली. ही गंभीर घटना मिटमिटा ते दूध डेअरी सिग्नलदरम्यान रविवारी (ता. 20) सायंकाळी सातनंतर घडली.

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी म्हणून परिचित असलेल्या औरंगाबादेत पर्यटकांचीच सुरक्षा धोक्‍यात येत आहे. सुमारे वीस मिनिटे कारने सलग पाठलाग करून टवाळखोरांनी महिलांना छेडत पर्यटक कुटुंबाला मारहाण केली. ही गंभीर घटना मिटमिटा ते दूध डेअरी सिग्नलदरम्यान रविवारी (ता. 20) सायंकाळी सातनंतर घडली.

जळगाव येथील दोन महिला व त्यांचे कुटुंबीय शुक्रवारी (ता. 18) जळगाव येथून अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर ते औरंगाबादेत पाहुण्यांकडे परतत होते. मिटमिटा येथे त्यांच्या कारला अन्य एका कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान धोकादायकरीत्या कार चालवून त्यांनी पर्यटकांना त्रास देणे सुरू केले. पर्यटक कुटुंबातील सदस्याने या टवाळखोरांना समज दिली. पण त्यांनी उलट त्रास देणे सुरू केले. कटकट टाळण्यासाठी पर्यटकांनी कार वेगाने घेण्याचे चालकाला सांगितले. कार वेगात निघाल्यानंतर अन्य एका कारमधील टवाळखोरांनी त्यांच्या चालकाला कारचा पाठलाग करण्याची सूचना केली. त्यानंतर टवाळखोरांनी पर्यटकांचा पिच्छाच धरला. पाठलाग होत असल्याने पर्यटकही घाबरले.

कार महावीर चौकात पोचल्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तरीही त्यांचा टवाळखोरांनी कारद्वारे पाठलाग सुरूच ठेवला. अखेर पर्यटकांना त्यांनी दूध डेअरी सिग्नलजवळ गाठलेच. रस्त्यात कार आडवी लावून पर्यटकांच्या दिशेने कारमधील व्यक्ती आले. त्यांनी शिवीगाळ सुरू केली. यावेळी त्यांनी महिलांनाही शिव्याशाप देऊन अन्य पुरुषांना मारहाण केली. हा प्रकार वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच, त्यांनी धाव घेतली. पोलिस पाहून टवाळखोर पसार झाले. त्यांच्या कारचा क्रमांक पोलिसांनी टिपला आहे. संशयित तरुणांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पर्यटकांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, रात्री उशिरापर्यंत अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली.

सुरक्षा धोक्‍यात
शहरात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेचा प्रश्‍न वारंवार ऐरणीवर येत आहे. टवाळखोर, काही स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तींकडून त्यांना मारहाण, लुटीसह छेडछाडीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटक पोलिस व्हॅन असतानाही पर्यटकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत असल्याने सुरक्षा धोक्‍यात येत आहे.

Web Title: tourists beaten in aurangabad