दिवाळीच्या सुटीत अजिंठ्याकडे येणारे पर्यटक घटले

सचिन चोबे
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटकांच्या गर्दीने फुलणारी अजिंठा लेणी यंदा पर्यटकांची प्रतीक्षा करीत आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटली खरी; परंतु रस्त्याच्या गंभीर समस्येमुळे अजिंठा लेणीकडे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये अजिंठ्याच्या पर्यटन व्यवसायाला खिळ बसली आहे.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटकांच्या गर्दीने फुलणारी अजिंठा लेणी यंदा पर्यटकांची प्रतीक्षा करीत आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटली खरी; परंतु रस्त्याच्या गंभीर समस्येमुळे अजिंठा लेणीकडे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये अजिंठ्याच्या पर्यटन व्यवसायाला खिळ बसली आहे. जगाच्या नकाशावर अजिंठ्याचा वारसा कोरला गेला आहे. साता समुद्रापार लेणीचे आकर्षण

आहे. लेणी बघण्यासाठी अजिंठ्याकडे येणारा देशी, विदेशी पर्यटकांचा ओढा या पर्यटन मोसमात मात्र बहरला नसल्याचे जाणवते. महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांसह लेणीच्या परिसरातील व्यावसायिकांचे डोळे पर्यटकांची वाट बघत असल्याचे वास्तव दिवाळीच्या सुटीत याअगोदर कधी पहावयास मिळाले नाही. जागतिक वारसाचा ठेवा असलेली अजिंठा लेणी आता रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. दिवाळी सणाच्या काळात परतीच्या पावसाने तालुक्‍याला चांगलेच झोडपले. यामुळे गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे करून ठेवलेले खोदकाम पर्यटनासाठी मोठा अडसर ठरले आहे. पर्यटनाच्या मोसमात लेणीमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत असल्यामुळे येथील व्यावसायिकांच्या देखत डोळ्यात पाणी येत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून होणारी परिसरातील व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल यामुळे ठप्प
झाली आहे. दिवाळीच्या सुटीत महामार्गावरील हॉटेल गर्दीने फुल्ल राहत होती. मात्र, यावर्षीची दिवाळी हॉटेल व्यावसायिकांचे दिवाळे काढणारी ठरली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या रस्त्यावरील रहदारी जागोजागी वाहने चिखलात फसू लागल्यामुळे ठप्प राहत आहे. अजिंठ्याकडे जाण्यापेक्षा पर्यटकांचा ओढा वेरूळ, शिर्डीकडे वाढला आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी केंद्रासह राज्य सरकार वेगवेगळे उपक्रम राबवीत असताना आता रस्त्याच्या ठप्प झालेल्या कामांमुळे अडचण निर्माण झाली आहे. रस्ताकाम हाती घेतले कशासाठी असा प्रश्न व्यावसायिक करू लागले आहेत. अजिंठा लेणीच्या मार्गावर हाती घेतलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांमध्ये सातत्याने विघ्न येत असून, या रस्त्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे
शासनाचे गांभीर्यपूर्वक लक्ष नसल्यामुळे पर्यटनाच्या मोसमात अजिंठा लेणीकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ ठप्प झाला आहे.

पेट्रोलपंप चालकांना फटका

अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पंधरा दिवसांत या रस्त्यावरील रहदारीही पर्यायी रस्त्याने वळविल्यामुळे याचा सर्वांत मोठा फटका या परिसरातील पेट्रोलपंप चालकांना बसला आहे. दिवसाकाठी होणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या विक्रीमध्ये निम्म्याने घट झाली असल्याची व्यथा पेट्रोलपंप व्यावसायिकांनी बोलून दाखविली.
 

हॉटेल व्यावसायिक अडचणीत

पर्यटनाच्या रस्त्यावरील हॉटेल व्यावसायिकही पर्यटकांचा ओघ पूर्णपणे कमी झाल्याने अडचणीत आले आहेत. एरवी गर्दीने भरलेली हॉटेल्स यावर्षी मात्र ओस पडली आहेत. या मार्गावरील बाळापूर हे गाव हॉटेल्सचे गाव म्हणून ओळखले जाते. शुद्ध शाकाहारी तसेच मांसाहरी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या या परिसरातील हॉटेल्स पर्यटक येत नसल्यामुळे ओस पडली आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists Number Come Down In Diwali Period