ट्रॅक्‍टर-दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार, दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अचलेर ग्रामपंचायत सदस्यावर काळाचा घाला 

जेवळी (जि.उस्मानाबाद) : ट्रॅक्‍टरच्या जोरदार धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला, तर दोनजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी सात वाजता दक्षिण जेवळी (ता. लोहारा) शिवारात घडली. दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. 

अचलेर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र महादेव सोलंकर (वय 62), हरिभाऊ दिगंबर पुजारी (वय 52) व अमितकुमार सुभाष अचलेरकर हे लोहारा येथील शासकीय कामे आटोपून दुचाकीने (एमएच 25 डब्ल्यू 5976) सायंकाळी सात वाजता अचलेरकडे निघाले होते. तर दक्षिण जेवळी शिवारातील भुसाप्पा गूळ खांडसरीजवळील शेतातील रास घेऊन चालक प्रदीप अण्णाराव शिंदे हे ट्रॅक्‍टरने (एमएच 25 एडी 0378) जेवळीकडे येत होते.

ट्रॅक्‍टरला जोडलेल्या ट्रॉलीचा अंदाज न आल्याने दुचाकीला जोरात धडक बसली. या अपघातात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र महादेव सोलंकर हे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले हरिभाऊ दिगंबर पुजारी व अमितकुमार अचलेरकर जखमी झाले. श्री. अचलेरकर यांना किरकोळ दुखापत झाली; तर हरिभाऊ पुजारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ सोलापूरला हलविण्यात आले.

माहिती मिळताच जेवळी येथील सरपंच मोहन पणुरे, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्‍यामसुंदर तोरकडे, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, प्रशांत मुरमे, आप्पाराव गायकवाड, नागनाथ आळंगे, आदिनाथ हराळे, सुधाकर गुंजोटी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका पाचारण केली. लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी हिराजी महादेव सोलंकर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीट अंमलदार अशोक गिरी तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tractor-bike accident One killed, two injured