वाहतूक कोंडीने रुग्णवाहिकांची कसरत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर वाहतुकीची कोंडी कायम आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना जणू अडथळ्यांची शर्यत पार करीत अपघात विभाग गाठावा लागत आहे; मात्र न्यायालयाने फटकारूनही ‘घाटी’चे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, रुग्णालयापर्यंत येऊनही रुग्णाला वेळेत ‘घाटी’त दाखल करण्यास अडचण येत आहे.  

नातेवाइकांची गर्दी कमी व्हावी आणि वाहनधारकांना पार्किंगची शिस्त लागावी, यासाठी घाटी प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे; पण घाटी आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेने केवळ दुचाकींवर लक्ष केंद्रित केल्याने रिक्षा, स्कूल बस, टॅंकर, लोडिंग वाहने सुसाट आणि मोकाट असल्याचे चित्र आहे.

त्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. तोंडदेखली कारवाई व दुचाकी उचलण्याशिवाय घाटीत मुख्य रस्त्यावर शिस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे मेडिसीन इमारतीतून तपासणीसाठी स्ट्रेचर व्हिलचेअरवर रुग्णांची ने-आण करणाऱ्या नातेवाइकांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या वेगावरही कोणतेच नियंत्रण नाही. शिवाय सायलेन्स झोन असला तरी हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे अपघात विभागासमोरील परिस्थिती कायम गोंधळाची असते. 

दोन रिक्षा स्टॅंडची जागा ठरवून दिलेली असताना ओपीडीच्या सकाळच्या वेळेत बाह्यरुग्ण विभागासमोरची रिक्षांची मुजोरी व खासगी वाहनांची बेशिस्त पार्किंग, दुपारच्या सत्रात अधीक्षक कार्यलयाशेजारी बनलेले रिक्षा स्टॅंड याकडे होणारे दुर्लक्ष नातेवाइकांना त्रासदायक ठरत आहे.

चारचाकींना मुभा 
घाटीत सध्या दुचाकी उचलण्याचा धंदा तेजीत असून बेशिस्त चारचाकी व अपघात विभागासमोर लागणाऱ्या चारचाकींकडे काणाडोळा केल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या बेशिस्त चारचाकींवरही कारवाईची मागणी कर्मचाऱ्यांसह रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून खासगी चारचाकी, लोडिंग वाहनांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

Web Title: traffic ambulance accident road