ना धाक ना धास्‍ती

ना धाक ना धास्‍ती

औरंगाबाद - शिस्तबद्ध वाहतुकीवरून कोणत्याही शहराची ओळख तयार होत असते. मात्र, औरंगाबाद शहरातील वाहतूक व्यवस्थेला आजपर्यंत वळण लागू शकलेले नाही. मुळात वाहतूक पोलिस त्यासाठी खास प्रयत्नच करताना दिसत नाहीत.  तत्‍कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी बेशिस्त चालकांना वळण लावण्याचा काहीसा प्रयत्न केला; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे नवीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासमोर बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्याचे मोठे आव्हान आहे. 

औरंगाबादेत वाहतूक व्यवस्थेला वळण लावणे अत्यंत कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर यापूर्वीचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनीही जाहीरपणे अपयशाची कबुली दिली होती. कुठलाही अधिकारी शहरात आल्यानंतर त्यांचे काम सुरू हाते. काही तरी सुधारणा करण्यासाठी निर्णय घेतले जातात. आम्ही दोन-तीन वर्षांत बदली झाल्यानंतर निघून जाऊ; परंतु केलेल्या कामाचा लाभ शहरासाठी होईल, अशी भूमिका अधिकाऱ्यांची असते. पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्यानंतर अमितेशकुमार यांनीही वाहतुकीला वळण लावण्याचा प्रयत्न केला; मात्र हेल्मेट वापरण्याची लागलेली सवय सोडली तर बेशिस्त वाहतुकीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. मुळात शहरातील बेशिस्त वाहनचालकांच्या मानसिकतेत बदल कसा करावा, असा प्रश्‍न आहे. शहराच्या चौकाचौकांत वाहतूक पोलिस बारा तास बाराही महिने उभा असतो, तरीही वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होत नाही. प्रत्येक वाहनावर कारवाई करणे शक्‍य नाही; मात्र कारवाईच्या भीतीने वाहनधारकांना शिस्त लागणे अपेक्षित आहे. शिस्त लावणे ही एकट्या पोलिसांची जबाबदारी नाही. त्यासाठी वाहनचालकांचेही योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. शहरात गेल्या काही दिवसांत बेशिस्त रिक्षाचालक आणि बिनधास्तपणे ट्रीपलसीट दुचाकीवरून जाणारा युवावर्ग वाहतूक बिघडविण्यास अधिक कारणीभूत ठरत आहे. तरुण दुचाकीवरून ट्रीपलसीट सिग्नल तोडून पळतात. त्यांच्या मागे उभे असलेले वाहनधारकही थांबण्याची तसदी घेत नाहीत. वाहनधारक सुसाट पळतात म्हणून वाहतूक पोलिस चौकाच्या मध्यामध्ये येत नाहीत. चार-चार वाहतूक पोलिस एकाच कोपऱ्यात उभे राहून कारवाई करतात किंवा गप्पा मारत उभे असतात. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्यांवर त्यांचा धाक राहिलेला नाही. दुसरीकडे रिक्षाचालक तर संपूर्ण रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. 

नेमके काय करावे? 
जालना रस्त्यावर रोज साधारण एक हजारपेक्षा अधिक रिक्षा धावतात. त्यांना कुठलीही शिस्त नाही. ते वाहतूक बिघडविण्यात मोठे योगदान देताना दिसत असतात पोलिस आयुक्त यादव यांनी आठवड्यातून तीन दिवस ‘ऑल आउट ऑपरेशन’ची संकल्पना सुरू केली. यामधून चोरटे, अवैध दारू विक्रेते, गुन्हेगार आणि वाहतूक नियम मोडणारे हाती लागतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. उपक्रम चांगला आहे; मात्र अशाच पद्धतीने वाहतुकीला वळण लावण्यासाठी आठवड्यातून एक-दोन दिवस व्यापक कारवाई करावी, ‘वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी माझे योगदान’ अशी संकल्पना राबवून वाहनधारकांमध्ये जनजागृती करावी, कठोर कारवाई करून वाहनधाकरांमध्ये धाक निर्माण करावा. असे झाले तरच बेशिस्त वाहतुकीला वळण लागू शकते. वर्षानुवर्षे बेशिस्तपणे असलेली वाहतूक सुधारली तर त्याचे श्रेयही पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना मिळू शकते. अर्थात यासाठी वाहनधारकांनीही आपले योगदान देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com