लातूरकरांकडून तब्बल ४५ लाखांचा दंड वसूल

सुशांत सांगवे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे लातूरकरांना चांगलेच महागात पडत आहे. त्याचबरोबर बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करत पोलिसांनी चांगलीच दंडवसुली सुरू केली आहे.

लातूर : गेल्या साडेपाच महिन्यात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल ४५ लाख ४७ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईतून नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, ट्रीपल सिट प्रवास करणे, कागदपत्र नसताना वाहन चालवणे या घटनांमध्ये शहरात आणि जिल्ह्यात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी वाहने चालविताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे, अशी चर्चा सध्या गल्लोगली होत आहे. पण यामागे वेगवेगळी कारणे आहेत. वाहने रस्त्यावर उभी करताना ती एकामागे एक उभी केली जात आहेत. अनेक ठिकाणी दुचाकींचा घोळका पहायला मिळत आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागापर्यंत वाहने उभी असलेली दिसतात. रिक्षा, कार ही वाहने रस्त्यांच्या मधोमध थांबून राहण्याचे प्रकारही वाढत आहेत. पर्यायाने वाहतूक रेंगाळत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला सुरवात केली आहे.

हेही वाचा - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया

नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या २ हजार १७४ जणांवर कारवाई करून चार लाख ३४ हजार ८०० रुपयांचा दंड पोलिसांनी जमा केला आहे. कागदपत्रे नसताना वाहने चालविण्याच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. अशा तब्बल ८ हजार ८५५ जणांवर कारवाई करून १७ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कागदपत्र असूनही सोबत न ठेवणाऱ्या २ हजार ४११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून चार लाख ८२ हजार २०० रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे.

राजकारण - बीडमधून कोणाची लागणार मंत्रिपदी वर्णी?

ट्रीपल सिट वाहने चालविणाऱ्या १ हजार ८४७ जणांवर कारवाई करून ३ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपली वाहने पार्किंगमध्येच उभी करणे, कागदपत्रे सोबत बाळगणे गरजेचे आहे, असे वाहतूक पोलिसांतर्फे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Police fines Rs. 45 lac in Latur