पोलिसांच्या उचलेगिरीने वाहनधारक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

बसस्थानक, रेल्वेस्थानकाची चाकरी
शहर वाहतूक पोलिस मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात घुसून आवारात लावलेली वाहने उचलून नेत आहेत. विशेष म्हणजे, बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाच्या आवारात संबंधित विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. या कंपाउंडमध्ये अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांना आवरण्याची जबाबदारी एसटी आणि रेल्वेची आहे. रेल्वेकडे रेल्वे सुरक्षा बलाची स्वतंत्र यंत्रणा तर एसटी महामंडळाकडे खासगी सुरक्षारक्षक तैनात आहेत. असे असताना या दोन्ही ठिकाणी कंपाउंडच्या आत घुसून वाहने उचलण्यात शहर वाहतूक विभागाला काय स्वारस्य आहे, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहे.

औरंगाबाद - शहर वाहतूक पोलिसांच्या मनमानी पद्धतीच्या वाहन उचलेगिरीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शहर वाहतूक पोलिसांचे मूळ काम वाहतुकीला वळण लावणे आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याऐवजी पोलिस मनमानी कारभाराला महत्त्व देत आहेत. विषेशत: वाहने उचलणाऱ्या व्हॅनमधील पोलिस आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला आहे. यामुळेच पोलिस विभागाची नाचक्की होत आहे.

वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील बेशिस्त दुचाकी वाहने उचलून नेण्यासाठी खासगी तरुणांना कामावर ठेवलेले आहे. दररोज सकाळपासून शहर विभागाची दोन वाहने शहरातील मिलकॉर्नर, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट, क्रांती चौक, जालना रस्ता, मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वेस्थानक अशा विविध ठिकाणी दुचाकी उचलण्याचे काम करीत आहेत. दुचाकी वाहने उचलताना खरोखर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांना उचलण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. मात्र, खरोखर रस्त्यात अडथळा निर्माण करणारी वाहने उचलण्याऐवजी सरसकट टार्गेट पूर्ण करण्याचे काम सुरू असते. अगदी मुख्य रस्त्यापासून पन्नास फुटांपर्यंतची वाहने फरफटत रस्त्यावर आणून टेंपोत भरली जातात.

वाहनधारकाने रस्त्याच्या अडथळ्याचा विचार करून दूरवर लावलेले वाहनही उचलून नेले, तर अशा काळजी घेणाऱ्या वाहनधारकांचा संताप झाल्याशिवाय राहत नाही. अनेक ठिकाणी दुकान, एटीएम, कॉम्प्लेक्‍सच्या बाहेर अडथळा नसलेलीही वाहने मनमानी पद्धतीने फरफटत उचलून नेली जात असल्याने शहरातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच मनमानीने सिडकोतील नागरिकही त्रस्त झाले होते. मात्र, राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर रस्त्यात अडथळे नसलेली वाहने काही दिवसांपूर्वी उचलून नेल्यानंतर सावे यांनी वाहतूक विभागाची कानउघाडणी केली होती. त्यानंतर सिडकोतील वाहने उचलणे बंद झाल्याने वाहतूक विभागाच्या जाचातून सिडकोवासीयांची सुटका झालेली आहे. असे असले तरीही शहर वाहतूक विभागाची मनमानी पद्धतीची वाहन उचलेगिरी सुरूच असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Police Vehicle Owner constrained