जालन्यात ड्रायव्हिंग बनलीय डेंजर 

उमेश वाघमारे 
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

जालना शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, बंद पडलेले सिग्नल, त्यामुळे वाहतुकीची सतत होणारी कोंडी, रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांसह कुत्रे, पुलांचे कोसळलेले कठडे, बंद असलेले पथदिवे यामुळे शहरात जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आली आहे.

जालना -  शहरामध्ये वाहन चालविणे आता असुरक्षित झाले आहे. कारण रस्त्यांवर पडलेले खड्डे, बंद पडलेले सिग्नल, त्यामुळे वाहतुकीची सतत होणारी कोंडी, रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांसह कुत्रे, पुलांचे कोसळलेले कठडे, बंद असलेले पथदिवे यामुळे शहरात जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आली आहे. त्यात भर म्हणून रस्त्याच्या कडेला वाहनांची पार्किंग आणि होणाऱ्या अतिक्रमणाचा त्रासही वाहनचालकांसाठी डोकेदुखी होत आहे. मात्र या सर्व बाबींकडे नगरपालिका आणि वाहतूक शाखा उघड्या डोळ्यांनी डोळेझाक करीत असल्याने परिस्थिती बदलण्यास तयार नाही. 

रस्त्यांवर जागोजागी खड्डे 
शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. यात शहरातील अंबड चौफुली-नूतन वसाहत-उड्डाणपूल-रेल्वेस्थानक ते गांधी चमन या मार्गासह पाणीवेस ते मंमादेवी- रेल्वेस्थानक रोडवर खड्डे दिसून येत आहेत. त्यात काही ठिकाणी तर मोठमोठे खड्डे अचानक समोर आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडते. परिणामी शहरातून वाहन चालविताना तारेवरची कसरत करण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे अनेकवेळा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांवर चर्चा होते; मात्र त्यातून फलित काही मिळत नाही, असे चित्र आहे. 

सिमेंटचे गट्टूही खचण्यास सुरवात 
शहरातील जवळपास प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण झाले असून शहरात सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहेत. सिमेंट रस्त्यांच्या कामांनी शहरातील रस्त्यांना आकार आला आहे. मात्र याच नवीन सिमेंट रस्त्यांवरील सिमेंटचे गट्टूदेखील खचून चालले आहेत. 

सिग्नलसह पथदिवे बंद 
शहरातील सिग्नल सुरू होणार असा ढोल वाहतूक शाखेकडून बडविला जात आहे. मात्र ते कधी सुरू होणार हा खरा प्रश्‍न आहे. बंद सिग्नलमुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास तयार नाही. तर दुसरीकडे शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अंधारात खड्ड्यांतून मार्ग काढण्याची वेळ येत आहे. 

उड्डाणपुलाचा कठडा अजूनही तसाच 
शहरातील नूतन वसाहतीतील उड्डाणपुलावरून सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी सळईचा ट्रक खाली कोसळला होता. त्यामुळे उड्डाणपुलाच्या वळणावरील कठडा ढासळला होता. हा कठडा बांधण्याची तसदी अजूनही नगरपालिकेने घेतलेली नाही, हे विशेष. तसेच शहरातील लक्कडकोट, मंमादेवी परिसरातील पुलाचेही लोखंडी कठडे गायब झाले आहेत. त्यामुळे नदीपात्रात वाहन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. 

मोकाट जनावरांच्या कारवाईचा कांगावा 
शहरातील मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करून मोकाट जनावरे कोंडवाड्यासह गोशाळेत ठेवली जातील, असा कांगावा वाहतूक शाखेसह नगरपालिकेने केला. मात्र प्रत्यक्षात एक-दोन जनावरांच्या मालकांवर कारवाई करून हा विषय संपविल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असून वाहनचालकांच्या अंगावर धावून येत आहेत. मात्र कारवाईसाठी वाहतूक शाखेसह नगरपालिका आता पुढे येण्यास तयार नाही. 

वाहतूक कोंडीकडे सतत दुर्लक्ष 
शहरातील शनिमंदिर, पाणीवेस ते शिवाजी पुतळा यादरम्यान सतत वाहतुकीची कोंडी होते. ही बाबा वाहतूक शाखेसह संपूर्ण शहराला माहीत आहे. मात्र तरीदेखील वाहतूक शाखेकडून या दोन ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पाऊले उचलली जात नाहीत. अनेकदा तर वाहतूक शाखेचे कर्मचारी कर्तव्यावर असताना अंबड चौफुली, शनिमंदिर परिसरात कोंडी होते. मात्र कर्मचारी बघ्याची भूमिका घेतात. वाहतुकीच्या प्रश्‍नाबाबत पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहण्यास तयार नसल्याने वाहतूक शाखाही दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. 

रस्त्यावर पार्किंग आणि अतिक्रमण 
शहरातील रस्त्यांवर वाहनांची पार्किंग केली जाते. तसेच हातगाडे, दुकानांचे बोर्ड, पानटपऱ्यांसह बांधकाम साहित्य रस्त्यांच्या कडेला पडलेले असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मात्र याकडेही नगरपालिका व वाहतूक शाखा लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 

बेशिस्त वाहतूक, वाहतूक शाखा मात्र शांत 
शहरात बेशिस्त वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऑटोरिक्षाचालक विनागणवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. तसेच फ्रंट सीट प्रवासी वाहतूक केली जाते. रस्त्याच्या कडेला पार्क होणाऱ्या ट्रक, ट्रॅव्हल्स, काळी-पिवळी यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो; परंतु या सर्व बाबींवर वाहतूक शाखा मात्र शांत असल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic problems