वैजापूर येथे मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

वैजापूर विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त एक हजार 500 पैकी साडेसातशे मतदान अधिकाऱ्यांना शनिवारी (ता.12) येथील कृष्णा लॉनच्या हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी प्रशिक्षण दिले. त्यांना प्रशिक्षण प्रमुख धोंडिरामसिंह राजपूत यांनी साहाय्य केले.

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः वैजापूर विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त एक हजार 500 पैकी साडेसातशे मतदान अधिकाऱ्यांना शनिवारी (ता.12) येथील कृष्णा लॉनच्या हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी प्रशिक्षण दिले. त्यांना प्रशिक्षण प्रमुख धोंडिरामसिंह राजपूत यांनी साहाय्य केले. आपले निवडणूक कर्तव्य अत्यंत जबाबदारीने व निष्पक्षपातीपणे पार पाडण्याच्या सूचना डॉ. सानप यांनी देऊन व्हिडिओ क्‍लिपच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या त्यांनी सांगितल्या.

गेल्या लोकसभा निवडणुकीत वीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांच्यावर कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचा उल्लेख करीत ते म्हणाले, की या निवडणुकीत कोणीही अधिकारी चुकणार नाही, याची खबरदारी घ्यावी. निवडणुकीचे काम सांघिक आहे. यासाठी प्रशिक्षणातील प्रत्येक बाब काळजीपूर्वक पार पाडावी व आयोगाची हस्तपुस्तिका वाचून त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडून सहकार्य करावे. धोंडिरामसिंह राजपूत यांनी विविध अर्ज कसे भरावेत याबाबत मार्गदर्शन केले. वैजापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी बाहेरील तालुक्‍याचे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. वैजापूर तालुक्‍यात दोन हजार 100 दिव्यांग मतदार असून, त्यांच्यासाठी सर्व सोयी आयोगाने पुरविलेल्या आहेत असेही ते म्हणाले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर महाजन, गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, पर्यवेक्षक एम.आर.गणवीर, मतदान विभागाचे सर्वश्री पी.डी.दुशिंग, सचिन गायकवाड, संतोष जाधव, क्षेत्रीय अधिकारी सुशील खिल्लारे, श्री. सुरडकर, श्री. चौकडे, श्री. पंडित, श्री. जाधव यांनी सहकार्य केले. तालुक्‍यात 346 मतदान केंद्र असून एक हजार 500 मतदान अधिकारी नियुक्त केलेले आहेत. क्षेत्रीय अधिकारी 45 नियुक्त केले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Training For Voting Officers In Vaijapur