नोटाबंदी; वाहतूक व्यवसायात मंदी ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

बीड - पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्याने वाहतूक व्यवसायात मंदी आली आहे. याचा फटका प्रवासी आणि वाहनधारक अशा दोघांनाही बसला आहे. सर्वांत जास्त नुकसान मालवाहतूक करणाऱ्यांचे होत आहे. दरम्यान, सुट्या पैशांवरून वाद होत असल्याचे चित्र आहे. 

बीड - पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्याने वाहतूक व्यवसायात मंदी आली आहे. याचा फटका प्रवासी आणि वाहनधारक अशा दोघांनाही बसला आहे. सर्वांत जास्त नुकसान मालवाहतूक करणाऱ्यांचे होत आहे. दरम्यान, सुट्या पैशांवरून वाद होत असल्याचे चित्र आहे. 

केंद्र सरकारने चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या. या निर्णयाने सर्वसामान्यांची धावपळ सुरू झाली आहे. पण, बाजारपेठेला "ब्रेक' लागले आहेत. शेतकरी, कामगार यांना आपली कामे सोडून तासन्‌तास बॅंकांमध्ये उभे राहावे लागत आहे. काहींना तर पाच - पाच तास उभे राहूनदेखील पैसे मिळत नाहीत. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास अडचणी येत आहेत. याचा सर्वांत मोठा परिणाम वाहतूक व्यवसायावर झाला आहे. मालवाहतूक करणारी पिकअप, छोटा हात्ती, टमटम यांसारखी व इतर वाहने पाच ते सहा दिवसांपासून जागेवर उभी आहेत. शहरात आणि ग्रामीण भागातील रिक्षाचालकांवरही प्रवाशांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. जेही प्रवासी येतात त्यांतील बहुतांश व्यक्तींकडे सुटे नसतात. त्यामुळे भाडे नाकारले जात आहे. परिणामी, मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 
 

व्यापाऱ्यांमध्ये असंतोष 
शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. सुटे पैसे नसल्याने बाजारपेठेतील खरेदी-विक्री जवळजवळ बंदच आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या येथील बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. परिणामी, व्यापारी त्रस्त झाले आहेत. 
 

नोटाबंदीचा वाहतूक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. माल आयात व निर्यात करण्यासाठी अडचण येत आहे. बाहेरगावी गाडी घेऊन गेल्यानंतर चालकाकडून हॉटेलमध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. बॅंकेतूनही दोन हजारांच्या नोटा अधिक मिळत आहेत. त्यामुळे त्याचे सुटेही मिळत नाहीत. मागील चार-पाच दिवसांपासून गाड्या जागेवरच उभ्या आहेत. 
- विजय काकडे, जिल्हा वाहतूक, चालक-मालक संघटना. 
 

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने मध्यंतरी बाजारपेठेत तेजी आली होती. मात्र, पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने पुन्हा तासन्‌ तास ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत आहे. 
- संतोष वाघमारे, रिक्षाचालक 

Web Title: transport business recession