esakal | ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीचा वापर सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

सिल्लोड : ट्रॉमा केअर इमारतीमध्ये प्रसूतीसाठी दाखल महिलांची व्यवस्था करण्यात  आली आहे. महिला रुग्णांची तपासणी करताना डॉ. बी. एन. मोरे.

ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीचा वापर सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड (जि.औरंगाबाद ) : उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील ट्रॉमा केअरसेंटरची वास्तू रुग्णालय प्रशासनाने वापरण्यास सुरवात केली आहे. मागील पाच वर्षांपासून ट्रॉमा केअर सेंटरची वास्तू तयार होऊनही संबंधित कंत्राटदाराने ट्रॉमाच्या इमारतीमधील महत्त्वाची कामे अर्धवट अवस्थेतच ठेवली होती.

यामुळे रुग्णालय प्रशासनाने ट्रॉमाचे हस्तांतरण करून घेण्यासाठी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रॉमाच्या वास्तूचे हस्तांतरण अद्यापही झालेले नाही. येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी तालुक्‍याह भोकरदन, कन्नड, फुलंब्री, सोयगाव तालुक्‍यांतील महिलांचे प्रमाण मोठे आहे. महिला रुग्णांचा वाढता भार बघता रुग्णालय प्रशासनाने ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये महिलांची प्रसूती करण्यास सुरवात केली आहे. यामुळे पाच वर्षांपासून सुरू असलेला ट्रॉमाचा ड्रामा शेवटी रुग्णांना आवश्‍यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालय प्रशासनानेच संपविला आहे. इमारतीमधील प्रलंबित कामे आता तरी संबंधित कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे.

तापाचे रुग्ण वाढले

उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विषाणूजन्य ताप (व्हायरल इन्फेक्‍शन) झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, मागील महिनाभरात दहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी बी. एन. मोरे यांनी दिली.


ट्रॉमा केअरची इमारत वापराविना पडून होती. ग्रामीण भागातून महिलांची प्रसूतीसाठी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णालयात महिन्याकाठी सहाशेच्या वर महिलांची
प्रसूती होते. महिला रुग्णांना आवश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी ट्रॉमा केअरच्या इमारतीचा वापर रुग्णालय प्रशासनाने सुरू केल्यामुळे महिला रुग्णांना पलंगांसह आवश्‍यक जागेचा वापर करण्याची सोय झाली आहे.
- हाजी मोहंमद हनीफ,
सदस्य, रुग्ण कल्याण समिती, सिल्लोड.

loading image
go to top