अपघातग्रस्त रुग्णांचा जीव रामभरोसे : घाटीचे ट्रॉमा केअर कोमात

योगेश पायघन
Friday, 29 November 2019

  • खासगीत जा, म्हणण्याची आली वेळ 
  • टीआयसीयूमधील सर्वच एसी बंद, रुग्णांचा कोंडला श्‍वास 
  • दहापैकी एकच व्हेंटिलेटर सुरू, दरवाजाही मोडकळीस 
  • रुग्णालय प्रशासन हतबल, निवासी डॉक्‍टर, परिचरिकांची कसरत 
  • व्हेंटिलेटरची अन्‌ यंत्रसामग्रीची मागणी लालफितीत अडकली 
  • महागड्या जीवनावश्‍यक गोळ्या-औषधी, सामग्रीचाही तुटवडा 

औरंगाबाद : अपघातग्रस्तांसह अन्य अतिगंभीर रुग्णांना अत्यावश्‍यक सुविधा तातडीने उपलब्ध करण्यासाठी घाटी रुग्णालयात दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात आले होते. ते सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. सर्व एसी बंद, एकच व्हेंटिलेटर सुरू आणि औषधांचा तर थांगपत्ताच नाही. त्यामुळे अपघात झाला आणि घाटीत आणले तर कृत्रिम श्‍वासोच्छ्वास लागल्यास अंबू बॅग दाबा, नाहीतर खासगीत जा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

11 व्या पंचवार्षिक योजनेत जिल्ह्यात ट्रॉमा केअर युनिट मंजूर झाले. जिल्ह्यातील पहिले ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यासाठी घाटी रुग्णालयाकडून प्रस्ताव देण्यात आला. त्याला राज्य योजनेतून 28 मार्च 2009 ला मान्यता मिळाली. त्यासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांचा टर्न की प्रकल्प बनवण्यात आला.

त्यात सहा व्हेंटिलेटर, 11 एसी, चार इन्फ्युजन पंप, 10 आयसीयू बेडसह 46 प्रकारची यंत्रे, सर्जिकल साहित्य, वस्त्र, साधनसामग्रीचा समावेश होता. 26 जून 2009 ला हे टीआयसीयू / सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट सर्जरी विभागाअंतर्गत सुरू झाले. 17 ऑगस्ट 2019 ला तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्‌घाटन झाले. गेली दहा वर्षे हे युनिट जीवनदायी ठरले.

जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जालना, परभणी, बुलडाणा, जळगाव, नगर, धुळे येथून रुग्ण उपचारासाठी या विभागात दाखल होतात. मात्र, महिन्यापासून येथील सर्व 11 एसी बंद पडले. त्यानंतर येथील सहापैकी तीन व्हेंटिलेटर कालबाह्य झाले. घाटीने पर्यायी व्यवस्था केली तरी हळूहळू सर्वच यंत्रे बंद पडू लागली.

टर्न की प्रकल्प मुदतबाह्य ठरला. दरम्यान, सर्व व्हेंटिलेटर बंद पडले. दोन नवे व्हेंटिलेटर दिले, त्यापैकी एक बंद तर सध्या केवळ एकच यंत्र सुरू आहे. तर गुरुवारी येथे दाखल असलेल्या दहापैकी गरज असलेल्या दोन रुग्णांना अंबू बॅगने कृत्रिम श्‍वासोच्छ्वास दिला जात होता. येथील निवासी डॉक्‍टर, परिचारिका आहे त्या परिस्थितीत विनातक्रार उपचार देण्यासाठी धडपड करत होते. 

सिद्धिविनायक ट्रस्टकडून अद्याप प्रतिसाद नाही

टीआयसीयूतील व्हेंटिलेटर बंदला "सकाळ'ने वाचा फोडली होती. त्यावेळी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिद्धिविनायक ट्रस्टकडून वीस व्हेंटिलेटर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ट्रॉमा केअरसाठी आवश्‍यक व्हेंटिलेटरची मागणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सिद्धिविनायक ट्रस्टकडे केली होती. मात्र, वर्ष सरले तरी सिद्धिविनायक ट्रस्टकडून मदत मिळाली नाही. 

जिल्ह्यातील शासकीय ट्रॉमा केअर असून नसल्यासारखी

शहरात केवळ घाटीत एकमेव शासकीय ट्रॉमा केअरची सुविधा आहे. तिलाही घरघर लागली आहे. तर आठ ट्रॉमा सेंटर मंजूर आहेत. मात्र, लालफितशाही, सार्वजनिक बांधकामच्या वेळकाढू धोरणामुळे हे सेंटरच कोमामध्ये गेल्यागत अवस्था झाली आहे. परिणामी अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालये गाठण्याची वेळ नातेवाइकांवर आली आहे.

 

एमसीआय निकषानुसार ट्रॉमा युनिटमधील यंत्रे कालबाह्य झाली आहेत. शासनाकडे आवश्‍यक त्या यंत्रांची मागणी केलेली असून देखभाल-दुरुस्ती करणाऱ्यांची थकबाकी असल्याने त्यांनीही काम बंद केले आहे. निधी मिळताच यंत्रखरेदी व दुरुस्त्या होतील. 
- डॉ कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटीत) पाच बेडचे ट्रॉमा युनिट आहे. मात्र, अद्याप सुरू झालेले नाही. जिल्ह्यातील इतर ट्रॉमा केअरच्या अनेक अडचणी आहेत. तरी अपघातग्रस्तांना 108 या आपत्कालीन रुग्णवाहिकेच्या सेवेने जवळच्या शासकीय रुग्णालयात गेल्यास उपचार होतात. 
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trauma Care unit GMCH Aurangabd without ventilatory air conditioning