बंदीच्या वेळातही ट्रॅव्हल्स सुसाट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - ट्रॅव्हल्सला नियोजित वेळेत शहरात बंदी असताना सर्रास आदेश धुडकावत ट्रॅव्हल्स शहरातून धावत आहेत. रस्त्यावरच ट्रॅव्हल्स पार्क होत असल्याने वाहतूक समस्या वाढत असून मोठ्या अपघातालाही चालना मिळत आहे. 

औरंगाबाद - ट्रॅव्हल्सला नियोजित वेळेत शहरात बंदी असताना सर्रास आदेश धुडकावत ट्रॅव्हल्स शहरातून धावत आहेत. रस्त्यावरच ट्रॅव्हल्स पार्क होत असल्याने वाहतूक समस्या वाढत असून मोठ्या अपघातालाही चालना मिळत आहे. 

जड वाहनांसह रस्त्यावर कोंडी करणाऱ्या ट्रॅव्हल्सना शहरात नो एंट्री करण्यात आली आहे. दीड वर्षांपासून हे आदेश असून रात्री अकरानंतर सकाळी सातच्या आत त्यांना शहरात येण्यास मुभा आहे. असे असतानाही काही ट्रॅव्हल्स शहरात अकरापूर्वीच गर्दी करतात. सिडको उड्डाणपुलालगत एका महाविद्यालयाजवळ भररस्त्यातच ट्रॅव्हल्स उभ्या लावल्या जातात. रात्री अकरानंतर मात्र या ट्रॅव्हल्सचा वेग सुसाट असतो. औरंगाबादशिवाय अन्य शहरांतून येणाऱ्या ट्रॅव्हल्स वाऱ्याच्या वेगाने जालना रस्त्याने धावतात. यामुळे रहदारीला धोका निर्माण होत असून बहुतांश चालक व क्‍लिनर मद्य पिऊन ट्रॅव्हल्सची वाहतूक करतात. गुरुवारी झालेल्या अपघातात शहरातून ट्रॅव्हल्स दर्गा चौकाकडे येत होती. सकाळी सातनंतर अपघात घडला, अर्थातच शहरात बंदी असतानाही ट्रॅव्हल्स सुसाट धावत असल्याचे स्पष्ट होते. विशेषत: या वेळात वाहतूक पोलिस नसल्याने या ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावते. 

दर्गा चौकातील ट्रॅव्हल्स हटवा 
पोलिस विभागाने दर्गा चौकातील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये ट्रॅव्हल्स थांबा दिला आहे. मात्र, रात्री नऊपासून सकाळपर्यंत या चौकातील रस्त्यावरच ट्रॅव्हल्स उभ्या असतात. परिणामी रस्ता व्यापत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. येथे उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स हटवा अन्यथा त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. 

बाजारात येणाऱ्यांना त्रास 
दर्गा चौक परिसरात सोमवारी बाजार भरतो. त्यामुळे मोठी गर्दी होते. त्यातच भरबाजाराशेजारीच ट्रॅव्हल्स उभ्या लावल्या जातात. त्यामुळे बाजारात येणाऱ्यांसह वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. तसेच येथील कॉलनीतल्या रस्त्यावरही ट्रॅव्हल्स उभ्या राहत असून चालकांना सांगून, समज देऊनही हे ट्रॅव्हल्सवाले रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने नागरिकांत संताप आहे. 

कंपन्यांच्या वाहनांचा वेग आवरा 
मॉर्निंग वॉकला पहाटे अनेक लोक जातात. तसेच शालेय मुलेही पायी, सायकलने जातात. याच वेळात कंपन्यांची वाहने, खासगी बसेस तसेच ट्रॅव्हल्स सुसाट धावतात. त्यांना ना पादचाऱ्यांच्या जिवाची तमा, ना शाळेत जाणाऱ्या मुलांची. वेगामुळे अनेक अपघात घडत असून यांच्या वेगाला पोलिस विभागाने वेसण घालण्याची गरज आहे. 

Web Title: Travels are running the city