जखमी अवस्थेत सापडली ती, महिनाभरानंतर झेपावली आकाशी

Treatment on injured bird
Treatment on injured bird

औरंगाबाद - 'घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी' असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र, पिलू थोडे मोठे झाले, आईच्या नजरेतून सुटले आणि जखमी होऊन पडले. ते जखमी पिलू महिनाभराच्या उपचारानंतर पुन्हा आकाशात मुक्‍त वातावरणात झेपावले. 

महिनाभरापूर्वी सृष्टीसंवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक यांच्याकडे एका व्यक्‍तीने जखमी अवस्थेतील घारीचे पिलू नेऊन दिले. डॉ. किशोर पाठक हे त्यांच्या क्‍लिनिकमध्ये अनेक जखमी पक्ष्यांवर आणि सापांवर उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करत आहेत. वर्षभरात त्यांनी आणि त्यांच्या सर्पमित्र सहकाऱ्यांनी औरंगाबाद आणि
आसपासच्या परिसरातून पाच हजार सापांना पकडून वनविभागाच्या मदतीने निसर्गात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. डॉ. पाठक यांच्याकडे 16 नोव्हेंबरला एका व्यक्‍तीने घारीच्या जखमी पिलाला नेऊन दिले होते. त्या पिलाच्या पंखात बळ आल्यानंतर त्या घारीच्या पिलाला सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात सोडून देण्यात आले. 

या घारीला मुक्‍त वातावरणात सोडण्यापूर्वी चिकनचे मांस खाऊ घालण्यात आले. जातानाही पिलाने पोटभर मांस खाल्यानंतर डॉ. किशोर पाठक आणि त्यांचे सहकारी मनोज गायकवाड यांनी त्या घारीला मुक्‍त केले. याविषयी डॉ. पाठक म्हणाले, सृष्टीसंवर्धन संस्थेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत दीड हजार जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक वातावरणात मुक्‍त केले आहे.

यामध्ये चिमणी, कावळ्यापासून कोकिळा, गरुड, मोर, साळुंकी ते फ्लेमिंगोसारख्या पाहुण्या पक्ष्यांचाही समावेश होता. महिनाभरापूर्वी हे घारीचे पिलू जखमी अवस्थेत माझ्याकडे आले होते, त्याच्या पंखाला जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर औषधोपचार केल्यानंतर आता त्याचे पंख चांगले झाले. त्याच्या पंखात बळ आल्याने त्याला ही घार ज्या ठिकाणी जखमी अवस्थेत सापडली होती त्याच ठिकाणी सिडकोच्या प्रियदर्शिनी उद्यानात सोडून देण्यात आली. 

आतापर्यंत पकडले पाच हजार साप 
पूर्वी बांधावर, शेतात साप दिसला की लोक मारून टाकायचे. सृष्टीसंवर्धन संस्थेच्या सर्पमित्रांनी आतापर्यंत पाच हजार साप पकडले आणि त्यांना सोडून दिले. यामध्ये गेल्यावर्षी 32 अजगरांचा समावेश होता. शेततळे झाल्याने आणि त्यांची लपण्याची ठिकाणे कमी झाल्याने सरपटणारे जीव भक्ष्याच्या शोधात शेततळे, विहिरीत जाऊन पडतात. त्यांना त्यांचे भक्ष्य
मिळते; मात्र नंतर तिथून बाहेर पडता येत नाही. यामुळे सर्पमित्रांना बोलावतात. त्यामुळे तरी आता साप वाचत असल्याचे मत व्यक्‍त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com