शंभर झाडे जगवण्याची बॉण्ड पेपरवर दिली हमी!

अतुल पाटील
रविवार, 19 ऑगस्ट 2018

जिकातील मैदानाभोवतीची 100 झाडे जगवणार असल्याचे संघटनेतर्फे बॉंडपेपरवर लिहून दिले आहे. त्याप्रमाणे सोमवारपासून खुरपणी करणार आहे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणार आहे. दोन वर्षातच सारी झाडे तरारुन येतील, असा विश्‍वास आहे. 
- सुनील बनकर, अध्यक्ष, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना 

औरंगाबाद : वृक्षारोपण थाटात होते, फोटोही छापून येतात. कालांतराने संगोपनाअभावी बहुतांश रोपटी करपली जातात. अपवाद सोडल्यास हे सरसकटचे चित्र बदलण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (जिका) चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने वेगळाच संकल्प हाती घेतला आहे. शंभर झाडे जगवणार असल्याचे त्यांनी चक्‍क प्राचार्यांना बॉंडपेपरवरच लिहून दिले आहे. 

जिकामधील मैदानात संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातर्फे एक महिन्यांपूर्वी 150 झाडे लावली आहेत. संस्थेतील चतुर्थ कर्मचाऱ्यांनी त्यातील 100 झाडांचे संगोपन करण्याची कायदेशीररित्या जबाबदारी घेतली आहे. संस्थेत 40 कर्मचारी असून सोमवारपासून (ता. 22) रोटेशनपद्धतीने ते रोपांची काळजी घेणार आहेत. पाच कर्मचारी आठवडाभर रोज सकाळी आठ ते दहा असे दोन तास याकामी देतील, असे नियोजन आहे. 

पिंपळ, लिंब, जांभुळ, गुलमोहर यासारखी दोन फुट उंचीची झाडे लावली आहेत. पाण्यासाठी ठिबक सिंचन केले जाणार असून त्यासाठी जवळपास 35 ते 40 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कर्मचारीच ते पैसे जमा करणार आहेत. झाडांसाठी लागणारे खत परिसरातील पालापाचोळ्यापासून तयार केले जाणार. तसेच सतत तीन वर्षे काळजीदेखील घेणार आहेत. तंत्रशिक्षण विभागातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या स्व:खर्चाने वेगवेगळ्या उन्हाळी क्रीडा स्पर्धांचे मराठवाडास्तरीय आयोजन दरवर्षी होते. यादरम्यान ही कल्पना सुचल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. 

प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष सुनील बनकर यांनी बॉंडपेपर दिला. यावेळी सचिव हिरेंद्र बावसीवाल, सुनील महाले, मनोज अन्वीकर, सतिश कागडा, शेषराव भवर आदींची उपस्थिती होती. 

जिकातील मैदानाभोवतीची 100 झाडे जगवणार असल्याचे संघटनेतर्फे बॉंडपेपरवर लिहून दिले आहे. त्याप्रमाणे सोमवारपासून खुरपणी करणार आहे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणार आहे. दोन वर्षातच सारी झाडे तरारुन येतील, असा विश्‍वास आहे. 
- सुनील बनकर, अध्यक्ष, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना 

Web Title: tree plantation in Aurangabad