
पर्यावरणात झाडांचे खूप महत्त्व आहे. हेच हेरून औरंगाबाद येथे गतवर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस नव्याने झाडे लावून साजरा करण्यात आला.
औरंगाबाद - आषाढीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात पोचत होत्या; तर दुसरीकडे मैत्र ऑक्सिजन हबच्या वन पंढरीत "वृक्षच आमचा विठोबा, वृक्षच आमची विठाई' अशी खुणगाठ बांधत, वृक्ष वारकरी वृक्षारोपणात तल्लीन झाले होते. आषाढीच्या दिवशी गतवर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस या वारकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरणाचा संदेश देत, जल्लोषात साजरा केला.
मैत्र ऑक्सिजन हबच्या वन पंढरीत लहान थोरांचा अमाप उत्साह होता, घन वनाबद्दल मनात उत्सुकता होती, कुणी वृक्ष घेऊन येते, कुणी खड्डे करीत होते; तर कुणी वृक्ष लागवड करीत होते. कुणी लावलेल्या वृक्षांना पाणी देत होते. गतवर्षी आषाढीच्या मुहुर्तावर मित्रपरिवाराच्या मदतीने घनवन उभारले. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त वृक्ष लावून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय वृक्ष वारकऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार हा उपक्रम घेण्यात आला.
वृक्षांसाठी वृक्षांपेक्षा इतर कोणतीही भेट अमूल्य असूच शकत नाही. वृक्षांना भावना असतात, वृक्षांना वृक्षांचा सहवास हवा असतो. वृक्ष हे परस्परांना खूप जपतात, एवढंच नव्हे तर ते शेजारील वृक्षासोबत जीवनसत्त्वांचे मुक्तहस्त आदान-प्रदान करतात. एकंदरित काय तर आम्हा वृक्ष वारकऱ्यांना प्रत्येक वृक्षात साक्षात विठोबा रखुमाई दिसतो. वृक्ष वारकऱ्यांचा हा उत्साह फक्त वृक्षारोपण करून थांबला नाही तर गेले संपूर्ण वर्षभर ते या वृक्ष विठोबा रुख्माईची मनोभावे सेवा करीत आहेत. वृक्षांचा केवळ वाढदिवस साजरा करून ते थांबले नाहीत; तर आणखी मोठं जवळपास दुप्पट घनवन उभारण्याची वीट रचली.
यांचा आहे सहभाग
या वृक्षारोपण कार्यक्रमात अमृत खाबिया, पंकज शाह, विनोद खोबरे, प्रवीण पांडे, राजेश जाटवे, रवी चौधरी, मेघा अग्रवाल, गोविंद पाटोदकर, अनुराधा पांडे, विजय देशमुख, श्रीमती जाटवे, बबिता गुप्ता, किरण सरपोतदार,वैशाली पालखेडकर,शीला खंडेलवाल, मानसी काळे, मृणाल पांडे, युगंधर देशमुख, सृष्टी पांडे यांनी सहभाग घेतला.