आदिवासी शिष्यवृत्तीचे संकेतस्थळावर त्रुटींचा डोंगर

प्रमोद चौधरी
मंगळवार, 23 मे 2017

हजारो विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्‍यता

हजारो विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्‍यता
नांदेड - पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित असून, शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागतात. त्यानुसार पाच एप्रिल 2017 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली. दीड महिना उलटूनही संकेतस्थळ अनियमितच आहे. शैक्षणिक सत्र संपले तरी आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरता आले नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती संकेतस्थळ हे गेल्या वर्षापेक्षाही कासवगतीने चालत आहे. संकेतस्थळ "लॉग इन' करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा ते लॉग इन न होता "अनएक्‍सपटेड ऍप्लिकेशन- एन्टर' हा रिमार्क दिसतो. अनेक प्रयत्न करून लॉग इन झाले तर अर्ज भरून झाल्यावर संकेतस्थळ पोर्टल लॉगआउट होऊन तोच रिमार्क दाखविते. चार-पाच वेळा अर्ज भरूनसुद्धा तो स्वीकारला जात नाही. प्रत्येक अर्ज भरण्याकरिता पुन्हा-पुन्हा नव्याने लॉग इन करावे लागत आहे. ही प्रक्रिया फारच किचकट, कंटाळवाणी; तसेच वेळ वाया घालविणारी असून खर्चिकही आहे.

संकेतस्थळ दिवसा व्यवस्थित काम करणे तर सोडूनच द्या, रात्रीही व्यवस्थित चालत नाही. अर्ज भरून झाल्यावर प्रिंटमध्ये अर्ज भरत असताना अनिवार्य निवडलेल्या डाक्‍युमेंटसमोर "राईट' चिन्ह न येता "रॉंग' चिन्ह येते. "पीडीएफ' फाईल तयार होत नाही. अशा अनेक त्रुटी या संकेतस्थळावर आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत.

शासनाने सध्या सर्व शिष्यवृत्ती ऑनलाइन केल्या आहेत. बॅंकेत विद्यार्थ्यांचे खाते काढून त्याला आधार क्रमांक लिंक करावे लागत आहे. शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात परस्पर जमा होत आहे. अनियमित ऑनलाइन यंत्रणा अर्जच स्वीकारत नसेल तर शिष्यवृत्ती जमा कशी होणार, हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी या योजनेपासून वंचित रहाण्याची भीती आहे.

Web Title: tribal scholarship website problem