दोन हजार विद्यार्थ्यांस वस्तुऐवजी थेट रक्कम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

विद्यार्थ्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांचे बिल किंवा वस्तू बघितल्यानंतर 60 टक्के रक्कम पहिल्या हप्त्यात तर 40 टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यात खात्यावर जमा केली जाणार आहे.

औरंगाबाद - आदिवासी विद्यार्थ्यांना आता वस्तू देण्याऐवजी साहित्यांची रक्कमच थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करणार आहे. औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांतील जवळपास दोन हजार आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गजनान फुंडे यांनी सांगितले. दरम्यान, येत्या काळात आदिवासी आश्रमशाळा आयएसओ, डिजीटल करण्यावर भर राहणार असल्याची माहितीही त्यांनी गुरुवारी (ता. 11) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी आर. जी. देशमुख यांची उपस्थिती होती. औरंगाबाद कार्यालयाअंतर्गत आदिवासी समाजाची जवळपास पावणेतीन लाख लोकसंख्या आहे.

फुंडे यांनी सांगितले, की दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे स्वतंत्र खाते व दहा वर्षांखालील विद्यार्थ्यांचे त्यांच्या आईबरोबर संयुक्त खाते उघडण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांचे बिल किंवा वस्तू बघितल्यानंतर 60 टक्के रक्कम पहिल्या हप्त्यात तर 40 टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यात खात्यावर जमा केली जाणार आहे. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेसात हजार, पाचवी ते नववीसाठी साडेआठ हजार तर दहावीसाठी साडेनऊ हजार रुपये खात्यावर जमा केले जाणार आहे. यामध्ये शालेय साहित्य, लेखनसामग्री, स्वच्छता प्रसाधने, अंथरुन-पांघरुण व इतर साहित्यांचा समावेश आहे.

औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांत शासकीय आश्रमशाळा अशा आठ वास्तू असून यामध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी आहेत. अनुदानित आश्रमशाळा 7 असून यामध्ये तीन हजारांच्या जवळपास विद्यार्थी शिक्षक घेतात. तर शासकीय मुलांचे वसतिगृह 9, मुलींचे पाच वसतिगृह आहेत. औरंगाबाद शहरात पाच विद्यार्थी वसतिगृह आहे आता विद्यापीठामध्ये 3 एकर जागा मिळाली असून येथे वसतिगृह बांधण्यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे निकाल आणि प्रवेश उशिरा होत असल्याचे आता वसतिगृहांमध्ये पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत.

आदिवासी वसतिगृहांसाठी स्वयंम योजना
राज्यातील आदिवासी वसतिगृहातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह इमारत क्षमतेअभावी वंचित राहावे लागते. आता अशा विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्यय स्वयंम योजना लागु करण्यात आलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायची असून त्यांना वर्षाला रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी औरंगाबाद कार्यालयाकडे 504 अर्ज आले होते त्यापैकी 102 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

बचतगटांना कुक्‍कुटपालन शेड देणार
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी महिला बचतगटांना कुक्‍कुटपालन शेड दिले जाणार आहे. सुरवातील तीन बचतगटांना शेड देण्याची योजना आहे मात्र आदिवासी महिला बचतगट नसल्याने अडचणी येत आहेत.

कौशल्यच्या योजनास प्रतिसाद
अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी कौशल्य विकसित होऊन त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांत 18 प्रकरणांचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. मात्र यातील काही प्रशिक्षणासाठी लाभार्थीच मिळत नसल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Tribal Students to get direct cash