'कॉंग्रेसची सत्ता हीच राजीव गांधी यांना श्रद्धांजली'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नांदेड - "आगामी काळात 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची सत्ता आणणे, हीच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना खरी श्रद्धांजली असेल. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे,' असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. 21) केले. 

नांदेड - "आगामी काळात 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची सत्ता आणणे, हीच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना खरी श्रद्धांजली असेल. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे,' असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. 21) केले. 

नांदेड जिल्हा कॉंग्रेस समितीच्या नवा मोंढा कार्यालयात राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात उफाळलेला दहशतवाद संपविण्याचे मोठे प्रयत्न केले होते. जिल्हा पातळीपासून ते देशपातळीपर्यंत दहशतवादाचा बीमोड झालाच पाहिजे, असेही ते म्हणाले. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणारे निर्णय घेत आहे, त्यामुळे या निर्णयांचा निषेध करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी झालेल्या असतानादेखील या सरकारने महाराष्ट्रात प्रतिलिटर अकरा रुपये जादा भाव वाढवला आहे. यामुळे दळणवळणासह इतर जीवनावश्‍यक वस्तूंवर परिणाम होत आहे. नांदेड जिल्हा कॉंग्रेस पक्षाचा आहे. आपले यश हे आपली जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक भाजप विचारश्रेणीच्या विरोधात होणार आहे. त्यासाठी नांदेड महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आली पाहिजे. नांदेडसह मराठवाड्यात कॉंग्रेस पुढे राहिली पाहिजे. पक्ष टिकला तरच आपण टिकू, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे आवाहन खासदार चव्हाण यांनी केले. पणन महासंघाचे संचालक सदस्य नामदेव केशवे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी आभार मानले. या वेळी भाऊराव चव्हाण उद्योग समूहाचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, बाजार समितीचे सभापती बी. आर. कदम, बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पापा मोदी, श्‍याम दरक, सुभाष देशमुख 
यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Tribute to Rajiv Gandhi