तीन तलाक प्रकरणी औरंगाबादमध्ये पहिला गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

केंद्र सरकारने नव्याने केलेला व अमलात आलेल्या तीन तलाकविरोधी कायद्यानुसार शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.13) गुन्हा नोंद झाला. शहरातील ठाण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. 

औरंगाबाद - केंद्र सरकारने नव्याने केलेला व अमलात आलेल्या तीन तलाकविरोधी कायद्यानुसार शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.13) गुन्हा नोंद झाला. शहरातील ठाण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. 

तीन तलाकप्रकरणी 19 वर्षीय झीनत बेगम शेख सलमान या महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, शेख सलमान शेख लाल (वय 23, रा. राजेंद्रनगर, नारेगाव) असे गुन्हा नोंद झालेल्या पतीचे नाव आहे. झीनत बेगम हिचा 10 मे 2018 ला सलमानसोबत विवाह झाला. तेव्हा तिचे वडील मुन्वर बेग अहेमद बेग यांनी तीन लाख रुपये हुंडा दिला होता.

लग्नानंतर काही दिवस झीनतला सलमानने चांगले वागविले; मात्र नंतर माहेराहून दोन लाख रुपये आणायची मागणी केली. त्यानंतर याबाबत तगादा लावला. दोघांत ऑक्‍टोबर 2018 पासून वाद सुरू झाले. 21 डिसेंबरला रात्री 12 वाजता सलमानने झीनतला माहेरी सोडले. त्यानंतर याप्रकरणी झीनतने 22 डिसेंबर 2018 ला एमआयडीसी सिडको ठाण्यात हुंडाबळी कायद्याप्रमाणे तक्रार दिली होती. त्यात महिनाभरानंतर 22 जानेवारी 2019 ला छळाचा गुन्हा नोंद झाला. नऊ ऑगस्टला झीनत घरी माहेरी असताना चुलतभावासोबत सलमान तेथे गेला. त्याने तिच्या वडिलांकडे दोन लाखांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच सलमानने तीन वेळा तलाक-तलाक-तलाक म्हणून फारकत घेत असल्याचे सांगून निघून गेला, असे तिने जिन्सी ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. यात 13 ऑगस्टला भादंवी 504 व 4 मुस्लिम महिला विवाहावरील हक्‍कांचे संरक्षण कायदा 2019 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक उपनिरीक्षक हिवराळे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Triple talaq cases First offense in Aurangabad