सहल विद्यार्थ्यांची अन् डोकेदुखी शाळांची

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - शाळांच्या सहलीसंदर्भात राज्याच्या शिक्षण संचालनालयाने तब्बल 22 अटी घातल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची सहल शाळा प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या अटींच्या अधीन राहूनच शालेय सहल काढण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत; तसेच सहलीदरम्यान एखादी अघटित घटना घडली तर त्याला जबाबदार शाळा प्रशासनाला धरणार असल्याने शाळांकडून सहली काढल्या जात नाहीत. त्याचा फटका राज्यातील पर्यटनस्थळांना बसत आहे. 

दरवर्षी शाळा, महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना विरंगुळा म्हणून; तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी सहल काढली जाते. काळानुसार सहलींचे स्वरूपही बदलले असून विद्यार्थी सुरक्षितता, पालकांच्या तक्रारी, आर्थिक भुर्दंड अशा अनेक कारणांमुळे शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीवर काही निर्बंध घातले. त्याचा फटका राज्यातील पर्यटनस्थळांना बसत आहे. तसेच आवडत्या ठिकाणी सहलीला जाता येत नसल्यामुळे विद्यार्थीही नाराज होत आहेत. 

मुलांना ऐतिहासिक, सांस्कृतिक विषयांची माहिती प्रत्यक्षपणे व्हावी, या हेतूने सहलीचे आयोजन करण्यात येते; मात्र मागील काही वर्षांत सहल उत्साहाच्या भरात अनेक अपघात घडले. त्यामुळे अनेक विद्यार्थी, शिक्षकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने शाळांच्या सहलीवर अनेक बंधने घातली आहेत. 

मुख्याध्यापकांना धरणार जबाबदार 
सहलीदरम्यान काही अघटित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांवर टाकली आहे. तसेच अपघात होतील, अशा पर्यटनस्थळांवर सहल नेण्यास मनाई असणार आहे; मात्र प्रस्ताव योग्य वाटल्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात येणार आहे. परिणामी, आता मुख्याध्यापक व शाळांनाच जबाबदार धरण्यात येत असल्यामुळे मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त करत शाळांच्या सहली काढणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र शालेय सहलीपासून मुकावे लागणार आहे. 

एसटीचेही असहकार धोरण 
एसटीमध्ये आरामदायी सीट व स्वच्छता नसल्यामुळे शाळांकडून खासगी ट्रॅव्हल्सला पसंती दिली जाते; मात्र खासगी बसमध्ये विद्यार्थी विमा ग्राह्य नसल्यामुळे शासनाच्या नियमानुसार एसटी महामंडळाच्या बसचा सहलीसाठी वापर करावा, अशा सूचना आहेत; पण एसटी महामंडळाकडूनही शाळांना अनेकवेळा बस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. 

या आहेत सूचना 
ऐतिहासिक स्थळे, किल्ले परिसरात जाणे टाळावे, राज्याबाहेर सहल नेऊ नये असे निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हे निकष तयार केले आहेत. विद्यार्थ्यांना धोकादायक ठिकाणी घेऊन जाऊ नये हा शासनाचा चांगला उद्देश असला तरी सहलीसाठी परवाना, मुख्याध्यापकांच्या नावे स्टॅंप पेपरवर हमीपत्र, विद्यार्थीनिहाय शिक्षक, सहलीचा खर्च; तसेच इतर अधिकाऱ्यांचे पत्र आदींमुळे शाळा सहल काढण्यास सरसावत नसल्याचे दिसून येत आहे. 

या आहेत अटी 

  • शाळा समितीचा सहलीसाठी ठराव 
  • सहलीचा जीआर 
  • गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र 
  • एसटी आगारप्रमुखांचे अर्ज 
  • केंद्रप्रमुखाचे पत्र 
  • शिक्षण विस्तार अधिकारी पत्र 
  • पालक संमतिपत्र 
  • विद्यार्थी संमतिपत्र 
  • सहलीत सहभागी विद्यार्थ्यांची यादी 
  • सहभागी विद्यार्थी, शिक्षक हजेरीपत्रक 
  • सहल नियमावली 
  • सहल नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा 
  • सहल खर्च अंदाजपत्रक 
  • प्रथमोपचार पेटीसोबत असलेल्याचे पत्र 
  • विद्यार्थी ओळखपत्र 
  • सोबत असलेल्या शिक्षकांचे ओळखपत्र 
  • विद्यार्थी साहित्य यादी 
  • शिक्षणाधिकारी मान्यतापत्र 
  • सहल महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जात नसल्याबाबतचे स्टॅम्प पेपरवर मुख्याध्यापकांचे हमीपत्र 


विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या हितासाठी सहलीचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते; परंतु सहलीसाठी घालण्यात आलेल्या अटी जाचक, कागदपत्रांची मोठ्या प्रमाणात जमवाजमव करणे कठीण जात आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये सहलीबाबत उदासीनता दिसून येत आहे. शालेय सहली काढल्याच नाहीतर पर्यटनस्थळे, किल्ले ओस पडतील. शिक्षण संचालनालयाने या अटी शिथिल कराव्यात. 
वाल्मीक सुरासे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com