त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. धारूरकर 

संकेत कुलकर्णी 
गुरुवार, 5 जुलै 2018

डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वर्णी लागली आहे. तसे नियुक्तीपत्र केंद्रीय उपसचिवांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना बुधवारी (ता. 4) पाठवले. 

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लिबरल आर्टस्‌ विभागाचे संचालक आणि पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वर्णी लागली आहे. तसे नियुक्तीपत्र केंद्रीय उपसचिवांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना बुधवारी (ता. 4) पाठवले. 

चार दशकांपासून इतिहास, पत्रकारिता आणि पुरातत्त्व या विषयातील अध्यापन करणारे डॉ. वि. ल. धारूरकर जगभरातील विद्यापीठीय पातळीवर मान्यताप्राप्त विद्वान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी समरस विचारवंत म्हणून ओळखले जातात. सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे एमिरिट्‌स प्रोफेसर असलेले ते भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) वरिष्ठ प्रोफेसरही आहेत. त्यांनी 'आर्ट ऍण्ड आयकॉनॉग्राफी ऑफ एलोरा जैन केव्हज्‌' या विषयावरील संशोधनासाठी डॉक्‍टरेट मिळवली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात पुरातत्त्वज्ञ म्हणून काम करत असताना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्‍यात दक्षिण भारतातील सिंधू संस्कृतीचे अवशेष त्यांनी उत्खननातून शोधून काढले. येथे पाच वर्षे काम केल्यानंतर ते अध्यापनाकडे वळले. 

जनसंवाद सिद्धांत, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकारिता, स्वामी विवेकानंद, आम्ही पाहिलेले बाबासाहेब (संपादित) अशी तब्बल 36 पुस्तके प्रकाशित असलेल्या डॉ. धारूरकर यांनी अमेरिका, चीन, जपान, इटली, जर्मनी, कॅनडा आदी अनेक देशांमध्ये संशोधन परिषदांत सहभाग नोंदवून शोधनिबंधांचे वाचन केले. जगभरातील नामांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे निबंध प्रकाशित झाले आहेत. 'आपत्ती व्यवस्थापन आणि प्रसारमाध्यमांची भूमिका' हा त्यांचा लेख संयुक्त राष्ट्र संघाच्या ज्ञानसंचयिकेत (रिपॉझिटरी) समाविष्ट झाला आहे. 

देशातील एखाद्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान मिळवणारे डॉ. धारूरकर मराठवाड्यातील पहिलेच व्यक्ती आहेत. येत्या 16 जुलैला त्रिपुरातील सूर्यमणीनगर येथे जाऊन कुलगुरूपद स्वीकारणार असल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. या राज्यातील आदिवासी जमातींच्या अभ्यासासाठी विशेष प्रकल्प राबवणार असल्याचेही ते म्हणाले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tripura Central University Vice Chancellor Dr Dharurkar