वाळूच्या ट्रकखाली चिमुकली चिरडली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - अरुंद गल्लीतून वाळूने भरलेला ट्रक रिव्हर्समध्ये नेताना चिमुकली चाकाखाली येऊन चिरडली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. नऊ) सव्वापाचच्या सुमारास बायजीपुऱ्यात घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकची नासधूस करून चालकाला बेदम मारहाण केली. 

औरंगाबाद - अरुंद गल्लीतून वाळूने भरलेला ट्रक रिव्हर्समध्ये नेताना चिमुकली चाकाखाली येऊन चिरडली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. नऊ) सव्वापाचच्या सुमारास बायजीपुऱ्यात घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकची नासधूस करून चालकाला बेदम मारहाण केली. 

मरियम इम्रान शेख ( वय तीन, रा. बायजीपुरा गल्ली क्रमांक :32) असे अपघातातील मृत चिमुकलीचे नाव आहे. मरियम सायंकाळी सव्वा पाचवाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होती. जेमतेम बारा फूट अरुंद गल्लीत चालकाने वाळूचा ट्रक (क्रमांक एम. एच. 30 एल 4959) घुसवला. यात चिमुकली चिरडली गेली. चालक भुरे खॉं पठाण (रा. बायजीपुरा गल्ली नंबर 20) याच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 

अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे समजताच जमाव संतप्त झाला. वाळूच्या ट्रकवर दगडफेक केली. त्यानंतर ट्रकची तोडफोड व नासधूस केली. दरम्यान, काहींनी चालकास बेदम मारहाण सुरू केली. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला. 

मारहाणीत चालकाच्या छाती व तोंडास जबर इजा झाली. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. 

जिन्सी पोलिसांसह उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानाबो मुंढे, रवीकांत बुवा, सी.डी. शेवगण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावले. अपघातानंतर शेकडोंचा जमाव जिन्सी पोलिस ठाण्याबाहेर जमा झाला होता. परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

गल्ली क्रमांक 32 ही अत्यंत अरुंद आहे. येथे बांधकामासाठी चालक भुरेखान वाळू टाकण्यासाठी आला होता. पण त्याने गल्लीत ट्रक रिव्हर्स गिअरमध्ये घेतला. क्‍लिनर नसल्याने त्याला अंदाज आला नाही व घरातून बाहेर आलेली मरियम चिरडली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

वाळू बंदीआड संधी! 
शहरातून वाळूची वाहतूक करण्यास बंदी आहे. पण निर्देशांचे उल्लंघन करून खुलेआम वाळू ट्रकची वाहतूक सुरू आहे. काही काळापूर्वी पुंडलीकनगर येथे व त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारे आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. बंदी असतानाही संधी साधून वाळूचे ट्रक शहरात वाहतूक करतात, यावर पोलिस व महसूल विभागाचा अंकुश राहिलेला नाही. 

Web Title: Truck crushed down girl