औरंगाबाद : ट्रकची अनेक वाहनांना धडक, एक ठार, पाच जखमी 

घटनास्थळावर जमलेला जमाव.
घटनास्थळावर जमलेला जमाव.


औरंगाबाद - सिल्लोडपासून सुसाट निघालेल्या ट्रकने शहरात येईपर्यंत अनेक वाहनांना धडक दिल्या. चंपा चौक ते चेलीपुरा रस्त्यावर पाच रिक्षांसह नऊहून अधिक दुचाकींना धडक देत गल्लीबोळांत घुसलेल्या ट्रकने फाजलपुरा पुलावर एका दुचाकीस्वाराला (एमएच 20 डीक्‍यू 2297) चिरडले. ही घटना शनिवारी (ता. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शेख मोसीन शेख अमीन (वय 26, रा. न्यू नंदनवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. 

आष्टी (जि. बीड) तालुक्‍यातील दहा टायरचा ट्रक (एमएच 18 एए 1423) सिल्लोडहून मका भरून निघाल्यानंतर फुलंब्रीमार्गे पुढे जाणार होता. सिल्लोड सोडल्यानंतर फुलंब्रीपासून त्याने काही वाहनांना धडका देण्यास सुरवात केली. भरधाव निघालेल्या ट्रकला थांबविण्यासाठी फुलंब्रीतून काही तरुणांनी पाठलाग सुरू केला. त्यामुळे ट्रकचालक सुसाट निघाला. सावंगी फाट्यावर त्याने दोन वाहनांना उडवल्यानंतर काही स्थानिक दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करत असल्याने त्याने हर्सूलकडे वळवून शहरात ट्रक घुसवला. हर्सूलमध्ये घुसताच त्याने जळगाव टी पॉइंटवरही दोन ते तीन रिक्षांना धडक देत पाणीपुरीच्या ठेल्याला उडवले. चालकाने साठे चौकातून ट्रक वळवून त्याच वेगात निजामोद्दीन चौकातून ट्रक घातला. निजामोद्दीन चौकातून वळल्यावर चंपा चौकमार्गे जमजम हॉटेलसमोर जाताच मोठ्या जमावाने त्याला अडवले व ट्रक थांबवला. आरडाओरड व जमाव पळत असल्याने पोलिसांचे पथक घटनास्थळी जात होते. जमावाने त्याला बाहेर खेचत बेदम चोप दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रकच्या धडकेत जखमी झालेले शेख इनामोद्दीन शेख करिमोद्दीन (वय 28, रा. कोहिनूर कॉलनी), शेख रईझुद्दीन शेख अफिझुद्दीन (वय 25, रा. आरिफ कॉलनी), किशोर शेट्टी (वय 52, रा. राजाबाजार), शेख अब्दुल सईद वाहेद (वय 35, रा. रहेमानिया कॉलनी), शेख जहीर शेख सबर (वय 35, रा. काचीवाडा) यांच्यावर घाटीत उपचार सुरू असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत शेख मोसीन हे दिवसभर रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करून रात्रीच्या वेळेत घाटी रुग्णालयात के. के. ग्रुपच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कामही करत असल्याचे के.के. ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. प्रवीण मोरे असे अटकेतील चालकाचे नाव आहे. त्याच्यासोबत अविनाश शिंदे सहकारी होता. 

घाटीतही गर्दी, जमाव संतप्त 
संतप्त जमावाला पांगविताना पोलिसांचे कौशल्य पणाला लागले. जमावाला पांगवत जखमींना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस उपायुक्तांसह पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने ट्रक जिन्सी ठाण्यात हलवला. जखमींना घाटीत आणल्यावर घाटीतही एकच गर्दी झाली होती. यावेळी पाचशेहून अधिक पोलिस, सर्व वरिष्ठ अधिकारी, दंगा नियंत्रण पथक उपस्थित होते. 
 

बीड जिल्ह्यातील ट्रकने अनेकांना धडका देत चार लोकांना जखमी केले, तर एकाचा मृत्यू झाला. चालकाला ताब्यात घेतले असून नागरिकांनी घटनास्थळाहून ट्रक काढण्यास मदत केली. अफवांवर विश्‍वास ठेवू नका. परिस्थिती नियंत्रणात आहे. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com