परभणीत "क्रीडा हब'साठी प्रयत्न - आमदार डॉ. पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर शनिवारी (ता. 24) तिसाव्या राज्य अजिंक्‍यपद शुटिंगबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन झाले. परभणी शहराला क्रीडा व शिक्षण हब करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही स्पर्धेचे उद्‌घाटक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी दिली.

परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर शनिवारी (ता. 24) तिसाव्या राज्य अजिंक्‍यपद शुटिंगबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन झाले. परभणी शहराला क्रीडा व शिक्षण हब करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही स्पर्धेचे उद्‌घाटक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी दिली.

जिल्हा शुटिंगबॉल संघटनेतर्फे ही स्पर्धा होत असून क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्‌घाटन झाले. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक सचिन देशमुख, राज्य संघटनेचे सचिव के. आर. ठाकरे, फेडरेशनच्या तांत्रिक कमिटीचे सदस्य गुलाब राठोड, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कल्याणराव रेंगे आदी उपस्थित होते.

राज्यभरातून आलेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट पथसंचलन करून मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते विविध रंगीत फुगे आकाशात सोडण्यात आले. फटाक्‍यांची आतिषबाजी करण्यात आली. तत्पूर्वी राज्य क्रीडा संघटनेचा ध्वज कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते फडकविण्यात आला.

आमदार डॉ. पाटील म्हणाले की, मराठवाड्यात मागासलेला म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता नावारूपाला येऊ लागला आहे. शिक्षणासह क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती सुरू आहे. शहराला क्रीडा व शैक्षणिक नगरी बनविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून मोफत सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. कृषी विद्यापीठानेही आधुनिक दर्जाच्या जलतरणिकेसह कायमस्वरूपी क्रीडा सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नेहमीच क्रीडा क्षेत्राला मदतीचा हात दिला आहे. यापुढे संधी दिल्यास राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेचेही आयोजन करू, असे रेंगे म्हणाले.

निधी उपलब्ध झाल्यास निश्‍चित क्रीडा सुविधा निर्माण करू, असे आश्वासन डॉ. व्यंकटेश्वरलू यांनी दिले. जिल्हा संघटनेचे सचिव अशोक खिल्लारी यांनी प्रास्ताविक केले.

प्रा. डॉ. सुनील मोडक यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय देशमुख यांनी आभार मानले. विठ्ठलसिंह परिहार, मधुकर घाटगे, प्रा. राजू जंपनगीरे, सुशील देशमुख, रणजित काकडे, शिवाजी वाघमारे, कृष्णा कवडी, रामदास पवार, राजू शहाणे, जगदीश नवले, धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांचे पुरुष व महिला गटाचे 22 संघ सहभागी झाले आहेत.

Web Title: trying to sports hub by dr. rahul patil