विद्यार्थी- बालकांना सदृढतेचे डोस

file photo
file photo

नांदेड : लहान बालके व किशोरवयीन मुलां- मुलींमधील तसेच प्रजननक्षम स्‍त्रिया व स्‍तनदा मातामधील आढळणारी रक्‍तक्षय ही मोठी समस्या आहे. महिला- मुलींसह लहान बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी सोमवारी (ता.२५) नोव्हेंबर जिल्‍हाभरात सशक्त बालक- विद्यार्थी अभियानास प्रारंभ करण्यात आला. अंगणवाडी केंद्र, जिल्‍हा परिषद शाळांमधील बालक- विद्यार्थ्यांना लोहयुक्त गोळ्या व रक्तक्षयावर मात करण्यासाठी औषधाचे डोस देण्यात आले.

सदृढ आरोग्यासाठी उपयुक्त विटामीन अभावी महिला- मुलींमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. याशिवाय बालक- विद्यार्थ्यांनाही लहान वयात रक्तक्षयासारख्या आरोग्य समस्यांशी झुंजावे लागत असल्याने जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सोमवारी जिल्हाभरात सशक्त विद्यार्थी अभियानास प्रारंभ करण्यात आला. अभियानांतर्गत विष्णूपुरी येथील अंगणवाडी केंद्रामध्ये महिला व बालकल्याण सभापती मधुमती कुंटुरकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस.व्ही. शिंगने, तालुका वैद्यकिय अधिकारी श्री. राठोड आदींनी ० ते ६ वयोगटातील बालकांना लोहाच्या गोळ्या खाऊ घालून सिरपचे डोस दिले. 

दूर्गा बाळ गणेश महोत्सवात महिलांचा सहभाग

दरम्यान जिल्ह्यातील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी अभियानानंतर आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. गरोदर मातांच्या सदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या दुर्गा बाळ गणेश महोत्सवामध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे मागील तीन महिण्यात सदृढ बालक जन्मदर वाढल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडून सादर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालकांच्या सदृढ व सशक्त आरोग्यासाठी या अभियानामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन सभापती सौ. कुंटुरकर यांनी केले.

रक्तक्षय टाळण्यासाठी सकस आहार

रक्‍तक्षयामुळे शारिरीक वाढ योग्‍य रितीने न होणे, शारिरीक कार्यक्षमता कमी असणे, बौध्‍दीक वाढ कमी होणे, प्रतिकारशक्‍ती कमी असल्‍यामुळे सांसर्गिक आजारास बळी पडणे यासारखे विविध दुष्‍परिणाम दिसून येतात. या समस्‍येवर मात करण्‍यासाठी केंद्र शासनामार्फत ॲनिमियामुक्‍त भारत अभियान कार्यक्रम राबविण्‍यात येत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगणे यांनी दिली.
बालकांमधील रक्‍तक्षय टाळणे योग्‍य व सकस आहाराचे महत्‍व, सशक्‍त शरीर- बुध्‍दीमान मन याची जाणीव विद्यार्थी- पालकांना वैद्यकिय अधिकारी डॉ. राठोड यांनी करून दिली.

स्वच्छतेचे महत्व

स्‍वच्‍छतेसाठी नियमित हात धुणे महत्‍वाचे असल्याने, अंगणवाडी पर्यवेक्षीकांनी मुलांना हात धुण्याचे प्रात्याक्षीक करुन दाखविले. अंगणवाडी केंद्रातील कार्यक्रमांच्या समारोपानंतर जवळच जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या व सिरपचे डोस देण्यात आले.
यावेळी स्तनदा माता, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी आदींसह ग्रामस्थ नागरीक उपस्थीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com