क्‍लासेसचालकांचे अपहरण करून मारहाण 

latur
latur

लातूर : दोन क्‍लासेसचालकांचे अपहरण करणे, त्यांना मारहाण करणे व 25 लाखांची खंडणी मागणे या कारणांसाठी कॉंग्रेसचे दोन नगरसेवक, व्हीएस पॅंथर संघटनेच्या प्रमुखासह सातजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. यात पोलिसांनी नगरसेवक सचिन मस्के याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत, तर इतर सहाजण फरारी आहेत. 

लातुरातील क्‍लासेसचालक अविनाश चव्हाण यांची गोळी घालून हत्या केल्याच्या प्रकरणाला सहा महिनेही होत नाहीत, तोच पुन्हा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कोटा (राजस्थान) येथे विजयसिंह हर्षप्रतापसिंह परिहार व राजीवकुमार रमाकांत तिवारी हे दोघे क्‍लासेस चालवत होते. येथील एका क्‍लासेसचालकाने लातुरात क्‍लासेस सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये परिहार व तिवारी यांनी उद्‌गम नावाने लातुरात क्‍लासेस सुरू केले. पण विद्यार्थ्यांअभावी क्‍लासेस बंद पडले. त्यानंतर परिहार व तिवारी यांनी अध्ययन नावाने येथील सिग्नल कॅम्प भागात क्‍लासेस सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

काही दिवसांनी व्हीएस पॅंथरचा प्रमुख विनोद खटके व कॉंग्रेसचा नगरसेवक पुनीत पाटील या दोघांनी लातुरात क्‍लासेस चालवायचे असल्यास आम्हाला पैसे द्या; अन्यथा क्‍लासेस बंद पाडू, अशी धमकी परिहार यांना दिली. मे 2018 मध्ये त्यांनी 25 लाखांची मागणी केली. पण इतके पैसे देणार नाही, असे श्री. परिहार यांनी सांगितले. त्यानंतर दरमहा एक लाख 11 हजारांची मागणी या दोघांनी केली. क्‍लासेसचालकांनी जून ते नोव्हेंबरपर्यंत दरमहा एक लाख 11 हजार असे एकूण सहा लाख 66 हजार रुपये त्यांना दिले. हे पैसे नेण्यासाठी खटके, पाटील व कॉंग्रेसचा नगरसेवक सचिन मस्के हे तिघे येत होते, असे परिहार यांनी फिर्यादीत सांगितले. 

डिसेंबरमध्ये पैसे देण्यास परिहार यांनी नकार दिला. त्यानंतर विनोद खटके याने आठ व नऊ डिसेंबरला परिहार यांना भेटण्यासाठी बोलावले होते; पण ते गेले नाहीत. दहा डिसेंबरला सचिन मस्के व त्याचे साथीदार परिहार यांच्या अंबाजोगाई रस्त्यावरील घरी गेले. तेथून त्यांनी परिहार व तिवारी यांना कारमध्ये घालून अंबाजोगाई रस्त्यावर नेले. गाडीतच त्यांना मारहाण केली व पैसे न दिल्यास ऍट्रॉसिटी, मुलींच्या छेडछाडीचे गुन्हे दाखल करू, पोलिसांकडे गेल्यास ठार मारण्याची धमकीही मस्के याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

या कारवाईसाठी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलिस निरीक्षक केशव लटपटे, उपनिरीक्षक नवले, संजय फुलारी, जगताप, ओगले, देशमुख यांनी पुढाकार घेतला. 

अधीक्षकांच्या सूचनेनंतर कारवाई
परिहार व तिवारी यांनी नातेवाईक व मित्रांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्याशी दोघांनी संपर्क साधला. डॉ. माने यांनीही त्यांना धीर दिला. शुक्रवारी रात्री पोलिसांनी नगरसेवक मस्के याला उचलले. इतर मात्र फरारी झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com