एकाच मंदिरात तुळजाभवानी, रेणुकामातेची मूर्ती

गजानन आवारे
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पैठण तालुक्‍यातील एमआयडीसी पैठणजवळील श्रीक्षेत्र मुधलवाडी येथील गावात एकाच मंदिरात श्री तुळजाभवानी माता व रेणुकामाता शेजारी बसलेल्या आहेत. शिवाय गावातच दोन मारुतीच्या मूर्तीसुद्धा एकाच मंदिरात असल्याने दूरवरून भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनास येतात. शनिवारी (ता. पाच) सातवी माळ असल्याने येथील तुळजाभवानी माता व रेणुकामाता यांचे भाविकांनी दर्शन घेतले.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्‍यातील एमआयडीसी पैठणजवळील श्रीक्षेत्र मुधलवाडी येथील गावात एकाच मंदिरात श्री तुळजाभवानी माता व रेणुकामाता शेजारी बसलेल्या आहेत. शिवाय गावातच दोन मारुतीच्या मूर्तीसुद्धा एकाच मंदिरात असल्याने दूरवरून भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनास येतात. शनिवारी (ता. पाच) सातवी माळ असल्याने येथील तुळजाभवानी माता व रेणुकामाता यांचे भाविकांनी दर्शन घेतले.

श्रीक्षेत्र मुधलवाडी येथे माहूरगडाचे उपपीठ व तुळजापूरचे उपपीठ असलेल्या या दोन देवी एकाच मंदिरात असणारे हे एकमेव मंदिर आहे. येथील मंदिर हे प्राचीन काळातील हेमाडपंती असून त्या मंदिराच्या दगडावर कोरीव काम केलेले आहे. या हेमाडपंती मंदिराला शिखर नव्हता. तो पुणे येथील मूळ रहिवासी व सध्या मुधलवाडी येथे स्थायिक झालेले भाविक लक्ष्मीनारायण परदेशी यांनी स्वखुशीने पाच लाख रुपयांचे भव्य असे शिखर तयार करून दिले असून मंदिराच्या बाजूला भाविकांसाठी भव्य सभामंडप तयार करण्यात आलेला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी (ता. पाच) सातव्या माळेला येथे भव्य यात्रा भरली होती. पैठण तालुक्‍यासह दूरदूरचे भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. या मंदिरासमोर मोठी दीपमाळ व मोठा देवीचा होमकुंड आहे. विशेष म्हणजे या मंदिरातील दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या असून तुळजापूरची देवीमाता ही तेलाची आहे, तर माहूरगडची रेणुकामाता ही शेंदुराची आहे. या दोन्ही देवी एकत्र असल्यामुळे याला येथे नवरात्रात मोठे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे राज्यातून भाविकवर्ग या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने मुधलवाडी येथील गावी येतात.

नवरात्रामध्ये मंदिराच्या शिखरासह मंदिरावर मोठ्या प्रमाणात विविधरंगी विद्युत रोषणाई केल्यामुळे ते आकर्षक दिसत आहे. नवरात्रामध्ये रोज येथे भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम होतात. विशेष म्हणजे येथील मारुती मंदिरातही दोन मारुती मूर्ती एकाच ठिकाणी असून या गावातच धनकनकेश्वर महादेव मंदिरसुद्धा प्रसिद्ध आहे. भाविकांना दर्शन सोयीस्कर व्हावे यासाठी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त पोलिस जमादार खंडू मंचरे, विजय मोरे, प्रदीप जाधव, पोलिस पाटील भाऊसाहेब जाधव यांनी ठेवला होता.
---------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuljabhavani, Renukamata Statues In One Temple