राष्ट्रपती भवनात तुळजापुरच्या चित्रकाराची चित्रे : पहा Photos

जगदीश कुलकर्णी
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित निवासी चित्रकार शिबिरामध्ये तुळजापूर येथील चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे यांनी रेखाटलेली चित्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आवर्जून पाहिली. राष्ट्रपतींच्या हस्ते श्री. शिंगाडे यांचा सत्कारही करण्यात आला.

तुळजापूर : राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या वतीने आयोजित निवासी चित्रकार शिबिरामध्ये तुळजापूर येथील चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरात त्यांच्या तीन चित्रांचा समावेश करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते श्री. शिंगाडे यांचा सत्कारही करण्यात आला.

Tuljapur News
राष्ट्रपती भवनात प्रदर्शित सिद्धार्थ यांचे चित्र

नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या वतीने दहा चित्रकारांचे निवासी शिबिर 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत पार पडले. या शिबिरात श्री. शिंगाडे यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. श्री. शिंगाडे यांनी दोन बाय पाच फुटांची दोन चित्रे आणि दोन बाय दोन फुटांचे एक चित्र रेखाटले. एका चित्रामध्ये गावाकडचे खेळणी विकणारे दांपत्य, तर दुसऱ्या चित्रात शिव आणि नंदीची चित्रे रेखाटली. तिसऱ्यात मासे विकणाऱ्या मुलाचे चित्र त्यांनी रेखाटले.

Tuljapur News
राष्ट्रपती भवनात प्रदर्शित सिद्धार्थ यांचे चित्र

श्री. शिंगाडे म्हणाले, की तुळजापूर शहरात माझे बालपण गेले. 25 वर्षे राहिलेल्या शहरातील एका खेळणी विकणाऱ्या दांपत्याचे चित्र रेखाटून मी माझ्या आठवणी प्रतिबिंबित केल्या आहेत. या चित्रातील नायक आणि नायिका माझ्या मातीतल्या आहेत. त्या साधारण निर्विकार आणि मूक आहेत. व्यवस्थेने त्यांचा आवाज पिढ्यानपिढ्या दाबला आहे. त्यामुळे त्या चित्रातील नायक-नायिकांना ओठ ठेवलेले नाहीत. दरवाजावर गावचे जीवन दाखविण्यात आले आहे. ही सर्व चित्रे आठ दिवसांत पूर्ण केली आहेत. क्रिएटिव्ह आणि आधुनिक चित्रशैली मांडणारी ही चित्रे आहेत, असे त्यांनी सांगितले. 

Tuljapur News
चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे यांचा सत्कार करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

श्री. शिंगाडे यांचे शिक्षण येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेत झाले. त्यानंतर लातूर येथेही त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयात शिक्षण झाले. आजपर्यंत अनेक ठिकाणी शिंगाडे यांनी चित्र शिबिरात सहभाग नोंदविला आहे. 'सकाळ' बालकुमार चित्रकला स्पर्धेत सिद्धार्थ शिंगाडे यांनी राज्यपातळीवरील चित्रकलेचे पारितोषिक मिळविले होते.

हेही वाचा - अधिकाऱ्यांचा तुटवडा, लातुरात होईनात रजिस्ट्री

चित्रे  कायमस्वरूपी राहणार

राष्ट्रपती भवनातील या शिबिरामुळे मला नवीन आयाम मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात पूर्वीची प्राचीन चित्रे आहेत. तथापि, माझी तिन्हीही चित्रे राष्ट्रपती भवनात कायमस्वरूपी राहणार आहेत. 
- सिद्धार्थ शिंगाडे, चित्रकार, तुळजापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuljapur Artist Honoured by President of India