शाकंभरी नवरात्र महोत्सवाला तुळजापुरात उत्साहात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

तुळजापूर - तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाला मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. मंदिरात कलश मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनाही करण्यात आली. यासह विविध धार्मिक विधी पार पडले.

तुळजापूर - तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाला मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. मंदिरात कलश मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनाही करण्यात आली. यासह विविध धार्मिक विधी पार पडले.

मंदिरात पौष शुद्ध दुर्गाष्टमी ते पौष पौर्णिमा (दोन जानेवारी) या कालावधीत शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाला आज सुरवात झाली. पहाटे तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती सिंहासनावर आधिष्ठित झाली. त्यानंतर अभिषेक होऊन तुळजाभवानीचे भोपे पुजारी शिवराज पाटील कदम यांच्या हस्ते धुपारती झाली.

पहाटे सहाला नित्योपचार अभिषेक झाले. दुपारी बाराला गोमुख तीर्थकुंडापासून कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर देवीच्या गाभाऱ्यातून अंगारा मिरवणूक पार पडली. शाकंभरी नवरात्र महोत्सवातील यजमान अजित किसन कदम-परमेश्वर, त्यांच्या पत्नी जयश्री कदम-परमेश्वर यांच्या हस्ते गणेशपूजन, कलशपूजन, बीजमंत्र, भवानी सहस्रनाम, दुर्गा सहस्रनाम आदी विधी झाले.

घरोघरी होते घटस्थापना
तुळजाभवानी मंदिरात अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र महोत्सवात घटस्थापना होते, त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्र महोत्सवात घटस्थापना होते, तसेच दररोज पूजा बांधण्यात येते आणि दररोज रात्री देवीचा छबिना होतो. या कालावधीत शहरात घरोघरीही घटस्थापना होते.

Web Title: tuljapur marathwada news shakambhari navratra mahotsav