तुळजापूर: मारले अधिकार्‍याने गुन्हा मात्र कर्मचाऱ्यावर?

तानाजी जाधवर
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावुन धरल्याने महसुल कर्मचाऱ्याला पुढे करीत वेळ मारुन नेली असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी अधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीही मागणी लावून धरली असली तरी पोलिस अधिक्षकांच्या समोर येऊन बोलायला कोणी धाडस करत नसल्याचे दिसत आहे.

उस्मानाबाद : तुळजापुरच्या येथील तुळजाभवानी मंदिरात बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याला येथील महसुल कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. २५) मध्यरात्री बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान घडली. मारहाण करणारे महसुलचे वरिष्ठ अधिकारी होते, मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या दबावापोटी केवळ कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची चर्चा पोलिसांत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून महसूल व पोलिस प्रशासनामध्ये चांगलेच शितयुध्द सूरु होते. त्याचे पर्यवसन आता मारामारीपर्यंत पोचले आहे. यावरुन पोलिस व महसुल प्रशासन यांच्यात शितयुद्ध सूरु झाल्याचे चित्र आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, रेल्वे पोलिस कर्मचारी शिवराज अरुण गिरी (वय २४ ) हे घाटशीळ पार्किंग येथील महिला, पुरुष विश्रांती कक्ष तसेच अभिषेक पेडपास काऊंटर येथे भाविकांच्या रांगा लावत असताना तुळजापुर तहसिल कार्यालयातील दत्तात्रय मेनकुदळे यांनी अरेरावी करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मेनकुदळे यांच्यासोबत असलेल्या तेथील महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचे बोलले जाते. मात्र गुन्हा नोंदविताना पोलिस प्रशासनानेही महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल न करता केवळ कर्मचाऱ्यावर दाखल केल्याने पोलिसांमध्ये संताप भावना आहे. या घटनेने दोन्ही विभागातील संघर्ष वाढणार असे चित्र आहे. मात्र, पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांचात समन्वय चांगला असल्याचे दाखविण्यासाठी या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सूरु होते.

पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावुन धरल्याने महसुल कर्मचाऱ्याला पुढे करीत वेळ मारुन नेली असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी अधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीही मागणी लावून धरली असली तरी पोलिस अधिक्षकांच्या समोर येऊन बोलायला कोणी धाडस करत नसल्याचे दिसत आहे.

Web Title: Tuljapur news beaten employee in Tuljabhawani Temple