तुळजापूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी

तुळजापूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी

उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाग कोरडाठाक

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्‍यातील इटकळ, मंगरुळ, सावरगाव या तीन महसूल मंडळांत बुधवारी (ता. २०) अतिवृष्टी झाली असून, कळंब तालुक्‍यात केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी सरासरी २४ मिलिमीटर पाऊस झाला असला, तरी काही भागांत अतिवृष्टी तर काही भाग कोरडाठाक असल्याने जिल्ह्यातील टॅंकरचा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही. 

जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला असून सर्वच म्हणजे सातही महसूल मंडळांत तीनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बुधवारीही तालुक्‍यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्‍यातील इटकळ महसूल मंडळात सर्वाधिक १४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक पाऊस असल्याची चर्चा इटकळ परिसरातील शेतकरी वर्गात होत आहे. तसेच जिल्ह्यातही गेल्या अनेक वर्षांपासून एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. तुळजापूर तालुक्‍यातील तीन महसुली मंडळांत बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक इटकळ मंडळात १४५, मंगरूळ ८० तर सावरगाव मंडळात ९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच तालुक्‍यातील इतर महसूल मंडळांतही समाधानकारक पाऊस झाला आहे. तुळजापूर ६२, नळदुर्ग ६४, सलगरा ५८ तर जळकोट महसूल मंडळात ४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्‍यात सरासरी ८३७ मिलिमीटर पाऊस पडतो. २१ जुलैपर्यंत संपूर्ण तालुक्‍यात ३२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

उस्मानाबाद, कळंब तालुक्‍यांत प्रतीक्षा

कळंब तालुक्‍यात बुधवारी केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. मोहा व इटकूर परिसरात नुसतीच भुरभूर होती. उस्मानाबाद तालुक्‍यातील बेंबळी महसूल मंडळात ३५, केशेगाव ४६, उमरगा तालुक्‍यातील मुरूम ६०, डाळिंब ४३, लोहारा तालुक्‍यातील लोहारा ५२, जेवळी ३५ तर परंडा तालुक्‍यातील सोनारी मंडळात ३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जूनपासून आतापर्यंत (२१ जुलै) उस्मानाबाद तालुक्‍यातील उस्मानाबाद ग्रामीणमध्ये ९२ मिलिमीटर, तेर मंडळात ९० तर कळंब तालुक्‍यातील येरमाळा मंडळात १०६, मोहा मंडळात ९८ तर सर्वांत कमी गोविंदपूर मंडळात केवळ ६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com