मेहनतीचं झालं सरपण!

सुषेन जाधव
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

औरंगाबाद - ‘एवढा दुस्काळ...तरी तयहाताच्या फोडापरमाणं तूर जपली. अळ्या पडू नये म्हणून काळजी घेतली; पण पोटऱ्यात येऊनबी शेंगाच न्हाई लागल्या. आता तूर वाळली. म्हंजी मेहनतीचं सरपणच झालं बघा!’, सत्तरीतील प्रयागाबाई पाचारे हताशपणे सांगत होत्या.

औरंगाबाद - ‘एवढा दुस्काळ...तरी तयहाताच्या फोडापरमाणं तूर जपली. अळ्या पडू नये म्हणून काळजी घेतली; पण पोटऱ्यात येऊनबी शेंगाच न्हाई लागल्या. आता तूर वाळली. म्हंजी मेहनतीचं सरपणच झालं बघा!’, सत्तरीतील प्रयागाबाई पाचारे हताशपणे सांगत होत्या.

पैठणखेडा (ता. पैठण) रस्त्याच्या कडेलाच एक वृद्घ जोडपे शेतात काम करीत होते. सत्तरीच्या वयातही त्यांचा उत्साह कमालीचा होता. आजीबाई सरपणासाठी तुरीच्या काड्या वेचत होत्या, तर थकलेले त्यांचे पती भाऊराव चाऱ्याची एकेक पेंडी गोळा करून रचून ठेवत होते. यंदाच्या पीकपाण्याविषयी त्यांना बोलते केले. त्यावर दुष्काळाने पीक हिरावल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाने ठाण मांडलेल्या मराठवाड्यात पाचारे दांपत्यासारखे अनेक शेतकरी संकटात आहेत. 

पाचारे दांपत्य एकाएकाने बोलत होते. ‘‘पयली जी बोंडं लागली त्यालाच कापूस व्हता. पुन्हा जम्नीत वलच ऱ्हायली न्हाई. ज्याच्या रानात पाणी त्यालाच खायापुरता माल पिकला. माझ्या रानात शाळू जवारी पेरली. ती गुडघाभरच आली. गेली वाळून. बाजरी निसली, फुलोरा लागला; पण वलच न्हाई राहिली. थोडाथोडका चारा झालाय.’’

अर्ध्या पोटी जनावरे दावणीवर 
भाऊराव सांगत होते,‘‘रानात बाजरीची धांडं आली, त्याचा चारा सध्या हाय. तोबी रोज पुरवून पुरवून टाकावा लागतोय. लेकरांसारखं जपलेले दोन बैल, गाय, गोऱ्हा अर्ध्या पोटीच दावणीवर बांधतोय.’’ अजून एका महिन्यानंतर चाऱ्यामुळं दावणीला बैलं राहतील की न्हाई, माहिती न्हाई, हे सांगताना प्रयागाबाईंनी डोळे पुसले. 

गावात दोन टॅंकर  
गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन टॅंकर येतात. पण, जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. युवक शहरात काम करतात, अशी माहितीही श्री. पाचारे यांनी दिली.

जर एका महिन्यानं चारा मिळाला तर बरंय, नाही तर जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. यामुळे बेभाव जनावरं विकावी लागतील. सरकारनी किमान चारा तरी जाग्यावर पुरवायला पाहिजे. 
- प्रयागाबाई पाचारे, पैठणखेडा (ता. जि. औरंगाबाद)

Web Title: Tur Crop Loss Drought Water Shortage