तुरीची आयात म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात विष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

लातूर - देशात दोन वर्षे पुरेल इतके कडधान्य आहे. तूर, हरभऱ्याच्या किमती हमी भावापेक्षा खाली आल्या आहेत. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी मोझांबिकमधून 15 लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्य आयात करण्याचा घाट घातला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात विष कालविण्याचा प्रकार असल्याची संतप्त भावना शेतकरी संघटनेने आज व्यक्त केली.

"आता मोझांबिकमधून कडधान्य आयात होणार' या आशयाचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. यासंदर्भात एकत्र येत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे म्हणाले, तूर, हरभऱ्याचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. हमी भाव केंद्रावर हे धान्य विकण्यासाठी लाखो शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 25 टक्के शेतकऱ्यांचा माल सरकार खरेदी करू शकले नाही. आजही कित्येक क्विंटल तूर, हरबरा पडून आहे. हजारो शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने माल विकला आहे. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा होता; पण उलटेच घडत आहे, हे जास्त चिंताजनक आहे.

इतर देशांतून कडधान्य आयात केल्यावर आपल्या बाजारपेठेतील भाव आणखी पडतील. याचाही सरकारने विचार करायला हवा; पण सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाही. फरकाची रक्कम देऊन शेतकऱ्यांना हमी भावाचे संरक्षण द्यायला हवे, असेही सस्तापुरे म्हणाले.

Web Title: tur import farmer loss