आधारभूत केंद्रावर आता सातबाराशिवाय तुरीची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

सात केंद्रांवर १७ हजार क्विंटल खरेदी; मुरूडचे केंद्र दोन दिवसांत सुरू

लातूर - आधारभूत किंमत योजनेतून जिल्ह्यात सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवर तुरीची विक्री करताना शेतकऱ्यांना सातबारा देण्याची गरज नाही. साध्या कागदावर अर्ज केल्यानंतरही शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. एम. एन. केरकट्टा यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना ही सवलत दिली. काही खरेदी केंद्रांना भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील तूर खरेदीचा आढावा घेतल्यानंतर सातबाराशिवाय तूर खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या सात केंद्रांवर आतापर्यंत १७ हजार पाचशे क्विंटल तुरीची खरेदी झाली असून येत्या दोन दिवसांत मुरूड (ता. लातूर) येथील खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मुरूडच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला हे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पत्र दिल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी सांगितले.

राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या (नाफेड) वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन जिल्ह्यात हमीभावाने सात केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. यंदा तुरीचे अधिक उत्पादन होऊन बाजारपेठेत भाव घसरण्याची शक्‍यता लक्षात घेऊन नाफेडने जिल्ह्यात १५ डिसेंबरपासून पहिल्यांदा चाकूर येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले. त्यानंतर औसा, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, उदगीर व शिरूर अनंतपाळ येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर तुरीला पाच हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात येत असून, खरेदीनंतर चार दिवसांत तुरीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे श्री. सुमठाणे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील तूर खरेदीचा आढावा दोन दिवसांपूर्वी श्रीमती केरकट्टा यांनी घेतला. त्यांच्यासोबत नाफेडचे कार्यकारी संचालक एस. के. वर्मा व अन्य अधिकारी उपस्थित होते. खरेदी केंद्रावर यापूर्वी तुरीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा सक्तीचा करण्यात आला होता. यातून शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर श्रीमती केरकट्टा यांनी सातबाराशिवाय तुरीची खरेदी करण्याचे आदेश दिले. केंद्रावर तुरीची विक्री करताना शेतकऱ्यांनी साध्या कागदावर अर्ज करून त्यासोबत आधारकार्ड; तसेच बॅंक पासबुकची झेरॉक्‍स दिली तरी तुरीची खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: tur purchasing with 7/12