कोविड केअर सेंटरमुळे लातूरकरांचे वाचले बारा कोटी 

हरी तुगावकर
Wednesday, 28 October 2020

महापालिकेच्या तीन केंद्रामधून तीन हजार ९१० रुग्णांवर उपचार 

लातूर : कोरोना संकटकाळात शहरातील नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. या सेंटरमध्ये एकाच वेळी ७५० रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होती. तीन हजार ९१० रुग्णांनी या केंद्रातून उपचार घेतले. यामुळे लातूरकरांचे १२ कोटी १३ लाख ५० हजार रुपये वाचले आहेत, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना काळात महापालिकेच्या वतीने कव्हा रस्त्यावरील समाज कल्याण वसतिगृह, औसा रस्त्यावर पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतिगृह आणि बार्शी रस्त्यावर बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय या तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. प्रत्येक केंद्रात २५० रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था होती. ५० खाटांना ऑक्सिजन सुविधाही देण्यात आली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना काळात एकूण ३ हजार ९१० रुग्ण या तीन केंद्रात दाखल झाले. त्यापैकी २ हजार ४२७ रुग्ण १० दिवस उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. शहरातील ७१९ रुग्णांनी गृह विलगीकरणात उपचार घेतले तर ६४९ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र पाठविण्यात आले. शासकीय नियम आणि दर पत्रकानुसार एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाने खासगी रुग्णालयात विना ऑक्सिजन उपचार घेतल्यास प्रति दिवस ४ हजार रुपये दर आकारण्यात येत होता. याशिवाय औषधी, डॉक्टरांसाठी पीपीई कीट, जेवण, विविध तपासण्या यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागत होते. हा सर्व खर्च हजारोच्या घरात जात होता. अशा काळात महानगरपालिकेने मात्र या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. ज्या काळात खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात नव्हते. त्यावेळी महानगरपालिकेचे कोविड केअर ज्या काळात खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात नव्हते. त्यावेळी महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. हा निर्णय लातूरकरांना संजीवनी देणारा ठरला. या केंद्रात रुग्णास राहण्याची सोय, औषधी, दोन वेळचे भोजन, नाश्ता व काढा देण्यात येत होता. रक्त तपासणी मोफत करण्यात येत होती. परिसराच्या स्वच्छतेसह रुग्णांना रोज योगासने व एरोबिक्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. ही केंद्र कार्यरत होण्यापूर्वी याच ठिकाणी नागरिकांसाठी विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. हजारो नागरिकांनी या सुविधेचाही लाभ घेतला, अशी माहिती श्री. गोजमगुंडे यांनी दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोग्य सेवकांचे काम 
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात खासगी अथवा शासकीय रुग्णालयात कर्मचारी उपलब्ध होत नव्हते. त्या काळापासून महानगरपालिकेच्या आरोग्य सेवकांनी पुढे येत सेवा बजावली. यादरम्यान त्यांनी एकही दिवस रजा घेतली नाही. रुग्णांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागणही झाली. तरीदेखील उपचारानंतर ते पुन्हा सेवेत दाखल झाले. काहीवेळा तर आरोग्य सेवकांना सलग ४८ तास काम करावे लागले. त्यांच्या या सेवेकरिता शहराचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे यांनी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve crores saved by Laturkar due to Kovid Care Center