मार्चपर्यंत बाराशे किलोमीटरचे रस्ते पूर्ण होणार 

मार्चपर्यंत बाराशे किलोमीटरचे रस्ते पूर्ण होणार 

औरंगाबाद - मराठवाड्यातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून बाराशे किलोमीटरचे रस्ते मार्चअखेरपर्यंत पूर्ण केले जातील; तसेच ऍन्युटीतून 2 हजार 270 किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांत हे रस्ते केली जातील त्याशिवाय 70 पुलांची दुरुस्ती 31 मेपर्यंत केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार यांनी शुक्रवारी (ता. तीन) पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ए. बी. सूर्यवंशी, मिलिंद बारभाई यांची उपस्थिती होती. 

मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले रस्ते आणि पुलांविषयी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत रस्ते आणि पुलाचे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. मराठवाड्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून हे रस्ते दुरुस्ती करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. विभागातील 1200 किलोमीटरचे रस्ते केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून हाती घेण्यात आले आहेत. ही कामे प्रामुख्याने 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील. 

ऍन्युटीसाठी 6 हजार 46 कोटींची मान्यता 
मराठवाड्यातील रस्ते मजबूत आणि चांगले करण्यासाठी राज्य सरकारने ऍन्युटीतून रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हजार 270 किलोमीटरचे रस्ते दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी 6 हजार 46 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. हे रस्ते बनविण्यासाठी डीपीआर तयार केला जाणार असून त्याकरिता कन्सल्टींग एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. डीपीआर झाल्यानंतर हे रस्ते दुपदरी बनविण्याचे काम हाती घेतले जाईल. सात मीटरचा रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दीड मीटरपर्यंत पेव्हरब्लॉक बसविले जाणार आहेत. ऍन्युटीमधून रस्ते करण्यासाठी लवकरच कंत्राटदारांची बैठक घेतली जाणार आहे. 

या रस्त्यांचे भाग्य उजळणार 
यामध्ये अंबड ते वडीगोद्री, जालना बायपास, पैठण, सिल्लोड, शिऊर बंगला, वाटूर-जिंतूर-नांदेड, बीड-परळी, परळी-धर्मापुरी-रेणापूर, अंबाजोगाई-अहमदपूर, लातूर-बार्शी, माहूर बायपास यांसारख्या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांकरिता 877 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 661 कोटींचा खर्च आतापर्यंत झाला आहे. 

70 पुलांची दुरुस्ती 
रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले होते. मराठवाड्यातील भराडी येथील नदीवरील पूल कोसळण्याची घटना घडल्यानंतर पुलांच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. आता 31 मेपर्यंत 70 पुलांची दुरुस्ती पूर्ण करून ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. 

पुलांची कामे प्रगतिपथावर 
मराठवाड्यात नव्याने 33 पूल बांधण्यात येणार असून, यांची कामे प्रगतिपथावर आहेत. भराडी नदीवरील कोसळलेला पूल नव्याने बांधला जात असून आपेगाव येथील गोदावरी नदीवरील खचलेल्या पुलाचेही काम सुरू आहे. फुलंब्री तालुक्‍यातील फुलमस्ता आणि गिरिजा नदीवर, तसेच मंठा तालुक्‍यात देवठाणा या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांतही नवीन पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. "नाबार्ड'अंतर्गत निधीमधून 11, तर राज्य शासनाच्या निधीतून 19 आणि रेल्वे सुरक्षा योजनेतून तीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांवर 121 कोटींचा खर्च होणार आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन हजार किमीचे रस्ते वर्ग 
मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन हजार किलोमीटरचे रस्ते त्यांच्याकडे वर्ग केले. त्यामुळे बांधकाम विभागाकडे जिल्हा परिषदेचे रस्ते वर्ग करण्यात आले आहेत. या रस्त्यांचाही प्राधिकरणाच्या कामांमध्ये समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com