पावसाचे वीस दिवस उरले, बीडला पुन्हा दुष्काळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

बीड जिल्ह्यातील प्रकल्पात फक्त 0.60 टक्केच साठा शिल्लक आहे. शंभर दिवसांत फक्त 267.3 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

बीड -  पावसाचे दिवस जसजसे संपत चालले आहेत, तसे जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची छाया गडद होत आहे. यंदाच्या मॉन्सूनचे शंभर दिवस संपले असून, आतापर्यंत फक्त 40.11 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे येथील दुष्काळी परिस्थिती कायम आहे. आगामी वीस दिवसांत तरी समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी जिल्हावासीय गणरायाला साकडे घालत आहेत.

सध्या जिल्ह्यात फक्त 0.60 टक्केच साठा शिल्लक राहिला आहे. पैठणच्या धरणातून माजलगाव धरणात पाणी सोडण्यात आलेले असून, पाण्याची आवक कमी असल्यामुळे माजलगाव प्रकल्प अजूनही ज्योत्याखालीच आहे.  जिल्ह्यात पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत फक्त 50 टक्केच पाऊस पडला होता. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या मॉन्सूनमध्ये तरी समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा होती. तशी पावसाने सुरवातही दमदार केली होती; परंतु नंतरच्या काळात जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. मॉन्सूनचे शंभर दिवस संपले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात फक्त 40.11 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे उरलेल्या वीस दिवसांत तरी समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी जिल्हावासीय आभाळाकडे नजरा लावून आहेत. 144 पैकी 103 प्रकल्प कोरडेच आहेत. 30 प्रकल्प ज्योत्याखाली असून 25 टक्के पाणीसाठा असणारे फक्त दहाच प्रकल्प आहेत. 25 ते 50 टक्‍क्‍यांत अवघा एकच प्रकल्प उरला आहे. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता शेतकरी सध्या चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. 

आता सहा व आठ दिवसांआड पाणी 
पैठण येथील जायकवाडीतून माजलगाव धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. यामुळे आता बीड शहरातील काही ठिकाणी सहा दिवसांआड, तर काही ठिकाणी आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. यामुळे आता शहरवासीयांना लवकरच पाणी उपलब्ध होणार आहे. 

टॅंकर व चारा छावण्या सुरूच 
जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न कायम आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 648 गावांसाठी 780 टॅंकर सुरू केले आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील 13 लाख नागरिकांना होत आहे. यासह 47 चारा छावण्यांत 29 हजार 130 पशुधनाला आधार झाला आहे. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty days of rains left