औरंगाबाद महापालिकेचे दोन अधिकारी निलंबित

माधव इतबारे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी निलंबित केले आहे. मंजूरपुरा येथील बोगस टीडीआर प्रकरणात पोलिसांनी डिसेंबर महिन्यात या दोघांना अटक केली होती. त्यामुळे तब्बल चार महिन्यांनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

औरंगाबाद - महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी निलंबित केले आहे. मंजूरपुरा येथील बोगस टीडीआर प्रकरणात पोलिसांनी डिसेंबर महिन्यात या दोघांना अटक केली होती. त्यामुळे तब्बल चार महिन्यांनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

शाखा अभियंता शिवदास राठोड आणि अनुरेखक मझहर अली अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत. मंजूरपुरा भागातील टीडीआर प्रकरणी पोलिसांनी 5 डिसेंबर 2018 ला या दोघांनाही अटक केली होती. 7 डिसेंबरला त्यांची जामिनावर मुक्‍तता झाली. दुसऱ्या दिवशी ते रुजूही झाले. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी आयुक्‍तांनी या दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. अटक झालेल्या तारखेपासूनच या दोघांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकरणात अटक झाली आणि तो 48 तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत किंवा तुरुंगात राहिल्यास त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या प्रकरण दोनमधील नियम चारमध्ये त्याबाबत तरतूद आहे. राठोड आणि मझहर अली यांना डिसेंबरमध्ये अटक झाली. त्याचवेळी त्यांच्यावर ही कारवाई होणे अपेक्षित होते; परंतु आयुक्‍तांनी जामिनावर मुक्‍त झालेल्या या दोघांना पुन्हा त्याच ठिकाणी रुजू करून घेतले होते. 
  
काय आहे प्रकरण 
रस्त्यामुळे एका इमारतीचे 144 चौ. मी. क्षेत्र बारा मीटर रुंद रस्त्यात बाधित झाले आहे. महापालिकेने दोन एप्रिल 1997 ला मालमत्ताधारकाला आठ लाख 25 हजार रुपये मोबदला दिला होता; मात्र 2016 मध्ये याच मालमत्तेच्या मोबदल्यासाठी पुन्हा टीडीआरची मागणी करण्यात आली. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनीही ही फाइल पुढे चालविली. टीडीआर प्रमाणपत्रही तयार झाले; पण प्रमाणपत्र देण्यापूर्वी तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांच्या गडबड लक्षात आली. त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. 

Web Title: Two AMC Officer suspended